वाई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची संख्या दुपटीने वाढत असून यामध्ये फारशी लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे (खराडे) यांनी केले.
वाई पोलीस प्रशासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जानवे म्हणाल्या, आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम राबवावेत. प्रत्येक मंडळांनी गरजू रुग्णांना रेमडेसिवर इंजेक्शनसाठी सहकार्य करावे. जयंतीबाबत शासनाने जी नियमावली दिली आहे, तिचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. यानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका काढू नयेत. आंबेडकर जयंतीला होणारा खर्च हा गावातील नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर, इंजेक्शनसाठी व कोरोना बाधितांवरील उपचारासाठी खर्च करावा. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे.
आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड म्हणाले, ज्यांनी देशाला संविधान दिले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाच शासनाने अनेक निर्बंध लादत असून त्याबाबत प्रशासनाने दुजाभाव करू नये. तरीही आंबेडकर अनुयायांनी घरातच जयंती साजरी करून समाजापुढे आदर्श ठेवावा. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, आरपीआय युवक प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी जयंती साजरी करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, यावेळी संतोष जाधव, श्रीकांत निकाळजे, रुपेश मिसाळ, जगदीश कांबळे, सतीश वैराट यांनी शंका उपस्थित करीत मत प्रकट केले. यावेळी आंबेडकर अनुयायी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.