अमोल कांबळे यांना अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 11:45 PM2017-08-09T23:45:40+5:302017-08-09T23:45:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटावचे तत्कालीन तहसीलदार व सध्याचे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदाचे प्रांताधिकारी अमोल कांबळे (वय ३१, रा. उस्मानाबाद) यांना वडूज पोलिसांनी साताºयात अटक केली. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी त्यांच्या हालचाली सुरू होत्या. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना गजाआड केले.
अमोल कांबळे यांना अटक व्हावी, यासाठी जनता क्रांती दलाचे सकाळपासूनच वडूजमध्ये धरणे आंदोलन सुरू होते. दरम्यान, सायंकाळी सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. गोसावी यांच्या विशेष पथकाने अमोल कांबळे यांना अटक केली. अटक झाल्याचे समजताच कांबळे यांना पाहण्यासाठी वडूजसह तालुक्यातून नागरिकांनी धाव घेतली. मात्र, कांबळे यांचा चेहरा झाकल्याने नागरिकांची यावेळी निराशा झाली.
खटाव तालुक्यासाठी २०१५-१६ साली आलेल्या दुष्काळ निधीत घोटाळा केल्याच्या आरोपावरून अमोल कांबळे यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दि. ५ रोजी फिर्याद दाखल केली होती. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिलेल्या आदेशानुसार डॉ. कांबळे यांनी दोन कोटी ९३ लाख दहा हजार ८५८ रुपयांचा घोटाळा केल्याचे अहवालात नमूद केले होते. या प्रकरणात डॉ. कांबळे यांच्यासह प्रवीण सारंग शिंदाडे, चैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कºहाड मर्चंट क्रेडिट को-आॅप. सोसायटी, शाखा वडूज, आयसीआयसीआय बँक शाखा वडूजचे शाखा प्रमुख राकेश मुनास्वामी नायडू, कºहाड अर्बन को-आॅप. बँक शाखा वडूज, विटा मर्चंट को-आॅप. शाखा वडूज यांनाही सहआरोपी म्हणून सहभागी केले होते.
अटकपूर्व जामिनासाठी सुरू होत्या हालचाली!
अमोल कांबळे हे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी साताºयातील एका वकिलांकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा लावून कांबळे यांना अटक केली. त्यानंतर त्यांना वडूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात आणण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, खटावचे नूतन तहसीलदार बेल्लेकर, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, आदी उपस्थित होते.