केंद्र अन् राज्य घरकुलात विभागात सातारा अव्वल, पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान 

By नितीन काळेल | Published: March 2, 2024 01:27 PM2024-03-02T13:27:26+5:302024-03-02T13:28:11+5:30

जिल्ह्याला २८ पैकी तब्बल १६ पुरस्कार प्राप्त

Amrit Mahaavaas Abhiyan in rural at departmental level under Central Prime Minister and State Sponsored Gharkul Yojana Satara top | केंद्र अन् राज्य घरकुलात विभागात सातारा अव्वल, पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान 

केंद्र अन् राज्य घरकुलात विभागात सातारा अव्वल, पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान 

सातारा : अमृत महाआवास अभियान ग्रामीणमध्ये विभागस्तरावर केंद्राच्या प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत अव्वल स्थान मिळवत सातारा जिल्ह्याने २८ पैकी तब्बल १६ पुरस्कार मिळवले आहेत. याबद्दल पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामुळे जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.

केंद्र तसेच राज्य शासनातर्फे पक्का निवारा नसणाऱ्या विविध समूहातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. ही घरकुल योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी पुरस्कारही दिला जातो. तर अमृत महाआवास अभियान ग्रामीण २०२२-२३ सुरू करण्यात आले आहे. याचा विभागस्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पुणे विभागात सातारा जिल्ह्याने सर्वच पातळीवर यशाचा डंका वाजवला आहे.

सर्वोत्कृष्ट जिल्हे या प्रकारात प्रधानमंत्री आवास ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत योजनेत सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर सर्वोत्कृष्ट तालुके प्रकारात प्रधानमंत्री योजनेत जावळी, कऱ्हाड आणि सातारा तालुक्यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले. तसेच राज्य योजनेत महाबळेश्वर तालुक्याने प्रथम तर माणला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठीही पुरस्कार होते. यामध्ये प्रधानमंत्री योजनेत कऱ्हाड तालुक्यातील येळगाव आणि पाटणमधील भुडकेवाडीने प्रथम तर पाटण तालुक्यातीलच काठी ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवला. राज्य योजनेत पाटणमधील बोंद्री ग्रामपंचायत प्रथम क्रमांकावर राहिली आहे.

शासकीय जागा उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत तीनही तालुके सातारा जिल्ह्यातील आहेत. कोरेगाव, सातारा आणि कऱ्हाड तालुक्यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला. तर वाळू उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरीत प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत योजनेतही पाटण तालुका प्रथम राहिला आहे.

या यशाचा गाैरव सोहळा पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुंडलवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सरंपच उपस्थित होते.

Web Title: Amrit Mahaavaas Abhiyan in rural at departmental level under Central Prime Minister and State Sponsored Gharkul Yojana Satara top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.