सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, १२ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. इच्छुकांना १९ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यामुळे सातारा लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे. असे असतानाच महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असला तरी महायुतीची प्रतीक्षा अजूनही कायम असल्याचेच दिसत आहे.सातारा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व दिग्गजांनी केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर, क्रांतीसिंह नाना पाटील यांचा समावेश आहे. तसेच मागील ४० वर्षांत प्रतापराव भोसले, हिंदूराव नाईक-निंबाळकर, अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील हे खासदार राहिले आहेत. आताची निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचे संकेत आहेत.सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सुट्टी वगळता इच्छुकांना १९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी होऊन अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर ७ मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महायुतीत मतदारसंघ भाजप की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार, याबाबत स्पष्टता नाही. दोन्हीही बाजूंनी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असतानाही दोन्ही पक्षांतील तिढा सुटलेला नाही. त्यामुळे महायुतीतील उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट नाही. तर वंचित बहुजन आघाडीने मारुती जानकर यांना रिंगणात उतरविलेले आहे. इतर छोटे राजकीय पक्षही आपले नशीब आजमावणार आहेत.
निवडणुकीचा तिसरा टप्पा..
सातारा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम असा
- दि. १२ ते १९ एप्रिल उमेदवारी अर्ज भरता येणार
- दि. २० एप्रिल उमेदवारी अर्ज छाननी
- दि. २२ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत
- दि. ७ मे मतदान
- दि. ४ जून मतमोजणी
शशिकांत शिंदे सोमवारी अर्ज भरणार..राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे हे सोमवार, १५ एप्रिल रोजी सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते उपस्थित राहणार आहेत.
माढा मतदारसंघासाठी सोलापुरात अर्ज..माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठीही शुक्रवारपासून सोलापूर येथे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. ते फलटण येथील आहेत. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा उमेदवार अजून ठरलेला नाही.