सिद्धार्थ सरतापेवरकुटे-मलवडी : तब्बल अकरा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माण तालुक्याच्या सरहद्दीवरील देवापूर परिसरातील असणारा ब्रिटिशकालीन तलाव काठोकाठ भरला आहे. महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी भरावावरून वाहत असल्याने धबधब्याचे स्वरूप आले आहे. यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लहानथोर पर्यटक देवापूर परिसरातील तलावास भेट देत आहेत. मात्र, आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत हजेरी लावणारे परदेशी पक्षी यंदाच्या सततच्या बदलत्या हवामानामुळे अद्यापही दिसेनासे झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.
हिवाळ्याच्या सुरुवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करीत विविध देशांतूून समुद्र पार करीत फ्लेमिंगो, चक्रवाक, रंगीत करकोचे, हळदी-कुंकू बदक, गवळी, पाणबुडी, परदेशी बगळा, मासोळी, बेडगे, कांडे कुरकुच्या, तोरंगी यासारखे विविध पक्षी येथील तलावावर येतात. या परिसरातील अनेक लहान-मोठे पाझर तलावावर साधारण मार्च महिन्यापर्यंत त्यांचा मुक्काम आढळून येतो. परंतु यावर्षी सर्वच लहान-मोठे पाझर तलाव भरलेले असतानाही सतत बदलत्या हवामानामुळे परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. सध्या राजेवाडी तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली असली तरी पक्ष्यांचे थवे नसल्याने बालचमू देशी-परदेशी पाहुणे केव्हा येणार ? याबद्दल साशंक आहेत. जवळपास चार महिने वास्तव्यास राहणारे रंगीबेरंगी परदेशी पाहुणे तलाव परिसरात के व्हा येणार? याबद्दल परिसरातील पक्षीमित्रांसह सर्वांनाच आतुरता लागून राहिली आहे.
माण तालुक्यातील सर्वात मोठा असणारा सव्वा टीएमसीचा ब्रिटिशकालीन देवापूर परिसरातील तलाव तब्बल अकरा वर्षांनंतर तुडुंब भरून वाहत आहे. याबद्दल शेतक ऱ्यांसह परिसरात आनंदी आनंद झाला आहे. मागील दहा वर्षाअगोदर एखादे वर्ष सोडले तर प्रत्येक वर्षी तलावात चांगल्यापैकी पाणी येत असल्याने परदेशातील पक्षी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावत होते. परंतु यावर्षी अकरा वर्षांच्या कालखंडानंतर हा तलाव परिपूर्ण भरला आहे. कदाचित याची चाहुल अद्याप लागली नसावी, यामध्ये सातत्याने बदलणारे वातावरण आहे. त्यामुळे यावेळी परदेशी पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे.- किरण बाबर, पर्यावरण अभ्यासक, देवापूर