सातारा : ‘सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन व यशोदा टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सातारा येथे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये या स्पर्धा होणार असून, देशातील २२ राज्यांतून ४०० मल्लखांबपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सचिव विठ्ठल गोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सहकार्य मिळाले आहे. खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था या कार्यालयाने केली असून, स्पर्धेसाठी लागणारे साहित्यही देण्यात येणार आहे. सर्व खेळाडू, पंच, प्रशिक्षक यांच्या जेवणाची व्यवस्थाही आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.जिल्हा मल्लखांब असोसिएशन ही संस्था गेली ३७ वर्षे मल्लखांब खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहे.
संघटनेच्या ५० हून अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविली आहे. संघटनेकडे ११ राष्ट्रीय तर १९ राज्य पंच आहेत. विश्वतेज मोहिते, माया मोहिते, विशाल दाभाडे, विक्रांत दाभाडे, आदित्य आहिरे यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर सुजित शेडगे यांना सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन शासनाने सन्मानित केले आहे.पत्रकार परिषदेतला जितेंद्र देवकर, सुजित शेडगे, डॉ. नरेंद्र नार्वे, विक्रांत दाभाडे, विश्वतेज मोहिते यांची उपस्थिती होती.