संन्याशाच्या डोक्यात वीट घालून खुनाचा प्रयत्न, डॉक्टरसह सात जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:38 PM2020-04-24T12:38:13+5:302020-04-24T16:22:36+5:30
यावरून त्यांच्यात वाद झाला. संबंतधांनी बिडकर यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात वीट मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. बिडकर यांच्याबरोबर शस्त्रक्रियेचा रुग्ण असतानाही त्यांना अडवून ठेवले. याप्रकरणी डॉ. अनिल पाटील यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : एका संन्याश्याला मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून यशवंत हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. अनिल पाटील यांच्यासह सुपरवायझर, टेक्निशियन, शिकाऊ डॉक्टर व इतर तिघांवर अशा एकूण सात जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी संतराज बिडकर ऊर्फ सुनील शामराव काळगुडे (वय ४३, संन्यासी, रा. महानुभव मठ, करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतराज बिडकर यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात लोखंडी तुकडा घुसल्याने त्याच्या पोटात जखम झाली होती. त्यामुळे बिडकर हे त्या व्यक्तीला घेऊन रुग्णालयात गेले. तेथे त्यांचा सिटीस्कॅन केला. त्यावेळी त्यांना २ हजार रुपये द्यायचे ठरले होते.
दुस-या दिवशी २२ रोजी सायंकाळी ५ वाजता ते हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी त्यांना सीटीस्कॅनचे तीन हजार रुपये मागितले. त्याशिवाय रिपोर्ट देणार नाही, असे सांगितले. त्यावर बिडकर यांनी मॅनेजरला भेटू द्या, असे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. संबंतधांनी बिडकर यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात वीट मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. बिडकर यांच्याबरोबर शस्त्रक्रियेचा रुग्ण असतानाही त्यांना अडवून ठेवले. याप्रकरणी डॉ. अनिल पाटील यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितोळे हे करत आहेत.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही मारहाण
सीटीस्कॅनचे पैसे कमी करण्याच्या कारणावरून चिडून जाऊन संतराज बिडकर व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी डॉ. अनिल पाटील, अमोल संजय भोसले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच भोसले यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी संतराज बिडकर व त्याच्यासह एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना यशवंत हॉस्पिटलमध्ये २२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.