सातारा : शहरातील भर वस्तीतील दोन एटीएम फोडण्याचा गुरुवारी मध्यरात्री प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंगळवार पेठेतील स्टेट बँकेच्या एटीएमचे तिजोरीचे कवर काढले. त्यानंतर त्याचे मॉनिटर फोडून त्याचे नुकसान केले. मात्र, चोरट्याला पैसे काढता आले नाहीत. तसेच राजधानी टॉवर्समधीलही बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.
या ठिकाणीही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. भर वर्दळीच्या ठिकाणी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एटीएमची सुरक्षा रामभरोसी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राजधानी टॉवर येथील एटीएमला सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. मात्र, सध्या या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अशा प्रकारच्या घडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दोन्ही एटीएममधील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून, दोन ते तीनजण सीसीटीव्हीत दिसत आहेत. सीसीटीव्ही फूटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.