सातारा : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. रात्रीच्या वेळी नळ सुरू राहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा आणि पाणी वाचवावे, अशी सूचना नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
ताडपत्रीची मागणी
सातारा : उन्हामुळे जनावरांना सावली मिळावी व पावसाच्या पाण्यापासून छतांचे संरक्षण व्हावे, यासाठी बाजारात ताडपत्रीची मागणी वाढत आहे. संचारबंदीच्या काळात शेतकरी आणि नागरिकांकडून ताडपत्रीला मागणी असली तरीही संचारबंदीमुळे ती उपलब्ध होण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उन्हाळी आजारांत वाढ
सातारा : वातारणात उष्णतेचे प्रमाण जास्त असून, त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. लहान मुलांना उष्णतेमुळे घामोळ्या तसेच डोळ्यांची जळजळ होणे असे आजार होत आहेत. त्यामुळे शरीरात थंडावा ठेवण्यासाठी आहारात बदल करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
कचरा डेपो परिसरात कचरा
सातारा : येथील सोनगाव कचरा डेपोच्या मार्गावर रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेकांकडून न लागणाऱ्या वस्तू, साहित्य यासह घरातील रोजचा कचरा पिशवीत भरून तो रस्त्याकडेला भिरकावला जात आहे. याचा त्रास या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना होत आहे.
माठांच्या वापरात वाढ
सातारा : वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागात घरामध्ये मातीपासून तयार केलेल्या माठांचा वापर जास्त प्रमाणात केला जाऊ लागला आहे. उन्हापासून थंडावा मिळण्यासाठी माठातील थंड पाण्याचा वापर होत आहे.
.....................