जाणिवा जाग्या; पालिकाच उदासीन!
By admin | Published: October 13, 2015 09:58 PM2015-10-13T21:58:30+5:302015-10-13T23:56:20+5:30
‘फक्त जागा द्या’ : महिलांसाठी प्रसाधनगृहांचा ‘लायन्स’चा प्रस्ताव वर्षभर पडून--जाणा ‘तिची’ कुचंबणा...
सातारा : महिलांसाठी प्रसाधनगृहांची वानवा ही समस्या किती गंभीर आहे, हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केलेल्या विवेचनातून स्पष्ट होताच, या समस्येवर गांभीर्याने काम करू पाहणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे हात पालिकेच्या अनास्थेने बांधले गेले असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ‘फक्त जागा द्या; आम्ही समस्या सोडवितो,’ असे लायन्स क्लबने दिलेले पत्र पालिकादफ्तरी वर्षभर धूळ खात पडून आहे. प्रसाधनगृहांचा प्रश्न केवळ महिलांच्या तत्कालीन गरजेशी नव्हे तर दीर्घकालीन आरोग्याशी कसा जोडला गेलेला आहे, हे विद्या बाळ यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विस्तृत मुलाखतीत सांगितले होते. ‘राइट टू पी’ म्हणजे ‘प्रसाधनगृहे असण्याचा स्त्रीचा हक्क’ या नावाने मोठ्या शहरांत चळवळी उभ्या राहत असताना साताऱ्यासारख्या छोट्या शहरात ही बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. त्यासाठी जाणीवजागृती आणि लोकसहभाग कमी पडतो, हे दाखवून देणारी ही मुलाखत सोमवारी प्रसिद्ध होताच अनास्थेचे एक मोठे उदाहरण समोर आले. जाणीवजागृती आहे, स्वयंसेवी संस्था तयार आहेत; पण पालिकेच्याच पातळीवर उदासीनता आहे, असे यातून स्पष्ट होत आहे.‘लायन्स क्लब आॅफ सातारा युनायटेड’च्या वतीने वर्षभरापूर्वी पालिकेला एक पत्र देण्यात आले. प्रसाधनगृहांअभावी महिलांची होणारी कुचंबणा आणि महिन्यातील अवघड दिवसांमध्ये होणारा कोंडमारा या समस्यांची दखल संस्थेने घेतली होती. संस्थेने पालिकेला शहरातील तीन ते चार ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
जागा दिल्यास संस्था स्वखर्चाने महिलांसाठी सुसज्ज प्रसाधनगृहे उभारणार होती. पोवई नाक्यावर मामलेदार कचेरी परिसर, शेटे चौक, बसस्थानक ते यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज रस्ता आणि राजपथावरील एखादे ठिकाण अशा चार जागा संस्थेने मागितल्या होत्या. परंतु या पत्राला साधे उत्तरही पालिकेकडून मिळाले नाही, अशी माहिती संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रमेश ओहोळ यांनी ‘लोकमत’ला दिली. महिलांना सर्व दृष्टींनी सोयीचे आणि उपयुक्त ठरेल अशा प्रसाधनगृहाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी आर्किटेक्ट नरेंद्र रोकडे यांनी स्वीकारली होती, असे ओहोळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘त्या’ दिवसांचाही विचार
महिन्यातील अवघड दिवसांचा विचार करून महिलांचा कोंडमारा होऊ नये, यासाठी प्रस्तावित प्रसाधनगृहांमध्ये ‘पॅड’चा साठा ठेवण्याची योजनाही तयार होती. त्यासाठी ‘लायन्स क्लब आॅफ जनसेवा’चे प्रवीण पाटील यांनी पुढाकार घेतला होता. ‘त्या’ दिवसांतील महिलांच्या गरजांची दखल घेऊन ही सुविधाही उपलब्ध केली जाणार होती. अर्थात, पालिकेने उत्सुकता दाखविल्यास ‘लायन्स’च्या माध्यमातून ही योजना अजूनही तडीस जाऊ शकते... फक्त पालिकेतील महिला लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा!
आडोशाचा असाही फायदा
पुरुष मंडळी निसर्गाच्या तातडीच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी अनेकदा झाडांचा आडोसा शोधतात. झाडांच्या खोडावरच ‘युरिनल’ बसवून पाइपद्वारे मूत्र टाकीत किंवा बॅरलमध्ये साठविल्यास पिकांसाठी नैसर्गिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून त्याचा वापर करता येईल, अशी संकल्पना या निमित्ताने पुढे आली आहे. शेण्या आणि साठविलेले मूत्र यांच्या मिश्रणातून बायोगॅस निर्मितीही शक्य आहे.