आकर्षक भित्तीचित्र फलकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:40 AM2021-01-23T04:40:15+5:302021-01-23T04:40:15+5:30
खंडाळा : खंडाळा नगर पंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. लोकांना स्वच्छतेविषयक बदल कृतीतून ...
खंडाळा : खंडाळा नगर पंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. लोकांना स्वच्छतेविषयक बदल कृतीतून घडवता आले पाहिजेत, यासाठी नगर पंचायतीकडून शहरातील प्रत्येक प्रभागात ठिकठिकाणी भित्ती फलकावर स्वच्छतेचा संदेश देणारी आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे खंडाळा शहराच्या स्वच्छतेत आमुलाग्र बदल घडत आहे. भित्ती फलकावरील चित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छतेच्या प्रसारासाठी नगर पंचायतीने जोरदार तयारी चालवली आहे. शहरात लोकजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरात प्रचार फेरीद्वारे संदेश देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शहरात स्वच्छता संदेश घरोघरी पोहोचावे, यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या भिंतींवर, संरक्षक भिंतींवर विविध प्रकारची आकर्षक चित्रे काढून स्वच्छता अभियानासाठी प्रोत्साहन दिले आहे. शहरातील प्रत्येक घरी जाऊन कचरा व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण याविषयी माहिती दिली जात आहे. शहरातील साफसफाई, सांडपाणी व्यवस्थापन, आठवडा बाजाराची स्वच्छता, नालेसफाई तसेच हागणदारीमुक्त शहर यावर भर देण्यात आला आहे. तसेच सुका व ओला कचरा स्वतंत्ररित्या जमा करण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यात आले. आता प्रत्यक्ष कार्यवाही सुलभरित्या करता यावी, यासाठी शहरात जागोजागी कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. कचराकुंड्या उपलब्ध झाल्याने सर्वांनाच सोयीस्कर ठरत आहे. विविध प्रभागांमध्ये कचराकुंडीचे व्यवस्थापन आणि स्वच्छता उपक्रम राबविण्यासाठी नगराध्यक्ष प्रल्हादराव खंडागळे, उपनगराध्यक्षा शोभा गाढवे, पक्षनेते अनिरुद्ध गाढवे, मुख्याधिकारी योगेश डोके यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी मेहनत घेत आहेत.
(कोट)
खंडाळा नगर पंचायतीने स्वच्छता अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे. नागरिकांनी आता उत्स्फूर्त सहभाग घेऊन ही मोहीम सक्षमपणे पुढे नेली पाहिजे. त्यासाठी अधिकच्या सुविधा देण्यासाठी नगर पंचायत सक्षम आहे. स्वच्छ व सुंदर शहर ही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजना आहे. खंडाळा शहराला हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- अनिरुद्ध गाढवे, नगरसेवक, पक्षनेते, नगर पंचायत खंडाळा
२२खंडाळा
फोटो - स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भित्तीफलक आकर्षकपणे रंगविण्यात आले आहेत.