सातारा : वाढीव वीजबिलाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मंगळवारी कंदील भेट आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात वीजबिल माफीसह अन्य काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील लोक कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. अशा काळात महागाई वाढतच चालली आहे. वीजबिले वाढून आली आहेत. यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. २०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, मीटर भाड्यात कपात करण्यात यावी, सक्तीची वीजबिल वसुली तत्काळ थांबवण्यात यावी, २०२० पासून वीजबिल भरले आहे अशा ग्राहकांसाठी अभय योजना तयार करावी. तसेच पुढील वर्षभर त्यांना बिल देऊ नये. ३० दिवसांनंतर रीडिंग घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष तुषार मोतलिंग, अमृत सूर्यवंशी, किशोर थोरवडे, विजय काटरे, सोमनाथ आवळे, संजय रुद्राक्ष, हसन मणेर, हंबीरराव बाबर, अमित कांबळे, किरण आवळे, तेजस जाधव आदी उपस्थित होते.
........................................................