योगेश घोडके ।सातारा : गळीत हंगामात साखर कारखान्यावर ऊस वाहतुकीला ट्रॅक्टरबरोबर बैलगाड्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्रामीण भागाबरोबर शहरातूनही वाहतूक दिवसन्रात्र होत असते. ऊसतोड कामगार ऊस वाहतुकीचा मोबदला मिळावा म्हणून बैलगाड्यांचा वापर करत असताना बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त ओझे वाहत असल्याने अनेकवेळा बैलांना इजा होत आहेत. यासाठी मागील आठवड्यापासून पोलिसांनी प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याचे काम हाती घेतले आहे.
बैलगाडीतून उसाची वाहतूक होत असताना बैलांच्या माना झुकलेल्या असतात. हे दृश्य पाहून प्राणीमित्रांनी संबंधित विभागाकडे सूचना नोंदविल्या आहेत. तरीदेखील याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत. मात्र मागील आठवड्यापासून पोलिसांनी बैलांना क्रूरतेच्या वागणुकीसंबंधी जनजागृतीनिमित्त बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्याचे काम हाती घेतले असून, मालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.मुळातच बैलगाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली की गुन्हा नोंद होतो, हे मात्र कोणत्याही गाडीमालकांना माहीत नसल्याने ते गाडीत क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक करतात.
गाडीतून एक ते दीड टन उसाची वाहतूक करणे आवश्यक आहे. असे न होता गाडीमधून जास्तीत जास्त ऊस कसा जाईल? यासाठी गाडीमालक अनेक शक्कल लढवतात. यामुळे बैलाच्या क्षमतेचा देखील विचार केला जात नाही. अनेकवेळा उन्हातान्हात बैलं दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम कायद्यांतर्गत गेल्या मंगळवारपासून ते आजपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी ५७ बैलगाड्यांवर पोलीस पथकाने कारवाई केली आहे. ही मोहीम मंगळवार, दि. २७ पर्यंत सुरूराहणार आहे.
शेतातून बैलगाडीत ऊस भरून कारखान्यापर्यंत बैलाच्या क्षमतेपेक्षा उसाची वाहतूक केली जाते. बैलांना हेच ओझे पेलताना माना सतत खाली झुकत असतात. या ओझ्यांबरोबर कुटुंबातील सदस्यांचंही ओझं बैलं ओढत असतात.-आर. के. कसबेकर कऱ्हाड शहर उपनिरीक्षक