खरीप हंगामाच्या मशागतीत बळीराजा व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:03+5:302021-06-09T04:48:03+5:30

वाई : वाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतींतर्गत कामाला जोमात सुरुवात केली आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहून दरवर्षी शेतकरी नव्या जोमाने ...

Baliraja is engaged in kharif cultivation | खरीप हंगामाच्या मशागतीत बळीराजा व्यस्त

खरीप हंगामाच्या मशागतीत बळीराजा व्यस्त

Next

वाई : वाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतींतर्गत कामाला जोमात सुरुवात केली आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहून दरवर्षी शेतकरी नव्या जोमाने शेतात कामाला लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या माथी कोरोनाचे व निसर्गाच्या लहरीपणाचे दुहेरी संकट असून, दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये तालुक्यातील शेतकरी शेतातील मालाला भाव न मिळाल्याने पुरता मोडून पडला आहे.

वाई तालुक्यातील खरीप हंगाम वाया जात असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. लॉकडाऊन काळात कवडीमोल भावाने शेतमाल द्यावा लागल्याने काही शेतकऱ्यांनी तर आपल्या मालाला भाव नसल्याने शेताच्या बांधावर टाकला. या उभ्या पिकात नांगर घातला, तरीही जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र नव्या जोमाने शेतात राबताना दिसत आहे. संपूर्ण वाई तालुक्यात पेरणीपूर्व, अंतर्गत मशागतीची कामे चालू झाल्याचे चित्र दिसत असून, निसर्गाने मनासारखी साथ दिल्याने समाधानाचे वातावरण आहे.

वाईच्या पश्चिम भागात भाताची तरवे टाकण्याचे काम चालू झाले असून, पूर्व भागात मात्र मृग नक्षत्रावर पेरणी करण्याच्या दृष्टीने तयारी चालू आहे. खरीप हंगामात बाजरी, मूग, सोयाबीन, भात, भुईमूग, बटाटा, हायब्रीड, तूर, वाटणा, घेवडा या पिकांच्या पेरणीसाठी वाई तालुक्यात शेतीची मशागत सुरू आहे. त्यातच बैलजोडी सध्या ठराविक ठिकाणीच मिळत असल्याने त्यांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा यांत्रिकी शेतीकडे झुकलेला दिसत आहे. चांगल्या पद्धतीचे बियाणे वापरण्यासाठी कृषी विभाग झटताना दिसत आहे. वाई कृषी विभागाने तर शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खते व बियाणे देण्याची तयारी दर्शविली असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले आहे. बियाणे मिळवण्यासाठी शेतकरी दुकानातून गर्दी करत आहेत.

(चौकट)

मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर...

वाईच्या पश्चिम व पूर्व भागात शेतकऱ्यांना बैलांची कमी भासत असून, बैलजोडी महाग झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टरचा आधार घेताना दिसत आहेत. खरीप हंगामासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे तर काही बागायती क्षेत्र असणाऱ्या गावांमध्ये भाजीपाल्यांचा निपटारा चालू आहे. त्यातच दोन दिवसांपासून आभाळाचे वातावरण असून, ढगाळ वातावरण असल्याने मान्सूनला लवकरच सुरुवात होईल, असे चित्र सध्या वाई तालुक्यात दिसत आहे.

Web Title: Baliraja is engaged in kharif cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.