पानटपरी चालकाला मारहाण ; दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 02:56 PM2020-02-07T14:56:21+5:302020-02-07T15:04:08+5:30
दारूच्या नशेत पानटपरी चालकाला दोघाजणांनी मारहाण करून पानपट्टीमधील मालाचे नुकसान केल्याची घटना सैदापूर, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दारूच्या नशेत पानटपरी चालकाला दोघाजणांनी मारहाण करून पानपट्टीमधील मालाचे नुकसान केल्याची घटना सैदापूर, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
समीर कच्छी (रा. सैदापूर, ता. सातारा) याच्यासह एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यामध्ये समावेश आहे. आण्णा परमेश्वर सोनावणे (वय २९, रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सैदापूर येथे आण्णा सोनावणे यांची पानटपरी आहे. दि. ५ रोजी रात्री नऊ वाजता समीर कच्छीने दारूच्या नशेत सोनावणे यांच्या पानटपरीजवळ येऊन विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
यावेळी सोनावणे यांनी तुम्ही दारू प्यायलेले आहात, मला शिवीगाळ करू नका, इथून निघून जा, असे सांगितले. त्यामुळे चिडून जाऊन कच्छी आणि अन्य एकाने सोनावणे यांना मारहाण केली. तसेच ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या विनोद परदेशी (रा. शाहूपुरी, सातारा) यांनाही संबंधितांनी मारहाण केली.
सोनावणे यांच्या पानटपरीतील मालाची तोडफोड करून नुकसानही करण्यात आले आहे. या प्रकारानंतर सोनावणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.