शिंगणापुरात बहरलंय बेल रोपवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:02 AM2017-08-09T00:02:45+5:302017-08-09T00:02:49+5:30

Beyond Shingnapore Bell Ropavan | शिंगणापुरात बहरलंय बेल रोपवन

शिंगणापुरात बहरलंय बेल रोपवन

Next



सचिन मंगरुळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या कल्पनेला माणच्या वन विभागाने मूर्त रूप दिले असून, महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया शंभू महादेवाच्या नगरीत शिखर-शिंगणापूर येथे बेल रोपवन आकार घेत आहे.
मागीलवर्षी श्रावण महिन्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिखर शिंगणापूर येथे देवर्शनासाठी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या १७६.५७ हेक्टर राखीव वनक्षेत्राची पाहणी करत असताना त्यांनी या ठिकाणी बेल रोपवन तयार करण्याची कल्पना मांडली. तसे केल्यास शंभू महादेवाला अर्पण करण्यासाठी आवश्यक बेलपत्र भक्तांना सहज उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या सूचनेनुसार माणच्या वन विभागाने राणंद येथील रोपवाटिकेत बेलाची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. रोपे तयार केल्यानंतर या रोपांची शिंगणापूर येथील वन विभागाच्या जागेत लागण करण्यात आली. साधारण एक हेक्टर क्षेत्रावर ६५० बेलाची रोपे लावली. बेल रोपवन तयार करण्यासाठी महाबळेश्वर, कास, ठोसेघरच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने एकूण दोन लाखांची आर्थिक मदत केली. फक्त लागवड करूनच वन विभाग थांबला नाही तर वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक नितीन जगदाळे व वनपाल महेंद्र पवार यांनी या रोपांची पूर्ण काळजी घेतली. वेळोवेळी किटकनाशके, औषधे फवारणी करून या रोपांचे संरक्षण करण्यात आले. याचा परिपाक म्हणून या रोपवनात लागवड केलेली
शंभर टक्के रोपे जिंवत असून त्यांची चांगली वाढ होत आहे. यामुळे परिसराची शोभा वाढण्यास मदत झाली आहे.
वन पर्यटनही
वाढीस लागणार...
शिखर शिंगणापूर येथील हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे वन विभागाच्या इतर क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात बेलांच्या रोपांची लागवड आवश्यक आहे. याचा मोठा फायदा होऊ शकतो. तसेच या तीर्थक्षेत्राला बेलांच्या रोपांनी सुशोभित करता येईल. शिंगणापूर येथे धार्मिक पर्यटनाबरोबरच वन पर्यटनही वाढीस लागेल. शिंगणापूर येथे साकारलेल्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल सर्वजण वन विभागाला धन्यवाद देत आहेत. त्याचबरोबर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे. याठिकाणी दरराजे शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे बेलाच्या पानाला महत्त्व आहे. भाविक बेल घेऊनच मंदिरात दर्शनासाठी जात असतात. यातून विक्रेत्यांना फायदा होत असतो.

Web Title: Beyond Shingnapore Bell Ropavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.