बामणोलीच्या बफरमध्ये बिबट्याची शिकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:02 AM2019-04-15T06:02:24+5:302019-04-15T06:02:35+5:30
बामणोलीच्या बफर क्षेत्रात दहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
क-हाड (जि. सातारा) : बामणोलीच्या बफर क्षेत्रात दहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेने वन्यजीव विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र असलेल्या वलवण (ता. महाबळेश्वर ) गावच्या हद्दीत ५ एप्रिल २०१९ रोजी वनमजूरांना गस्त घालताना बिबट्या मृतावस्थेत दिसला. या घटनेची माहिती वन्यजीव अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्याच रात्री उशिरा वन्यजीवचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्याचे अवशेष ताब्यात घेतले.
संबंधित बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची शिकार झाली, याबाबत गत काही दिवसांपासून तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, त्याची शिकार झाल्याची खात्रीशीर माहिती लोकमतला उपलब्ध झाली आहे. बामणोलीच्या वनहद्दीत गत अनेक दिवसांपासून शिकारी टोळ्यांचा वावर आहे. त्यांनी शिकार केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
>झाडावर मचाण कुणी घातलं?
वलवणमध्ये ज्याठिकाणी बिबट्या मृतावस्थेत आढळला त्याचठिकाणी एका झाडावर मचाण बांधण्यात आल्याचं समोर आलंय. ते मचाण कोणी आणि कशासाठी बांधलं, याचा तपास वन्यजीव विभागाने केला का? असाही प्रश्न आहे. अशा पद्धतीची मचाण शिकारीसाठी बांधली जातात. त्यामुळे वलवणमध्ये आढळलेलं ते मचाण शिकारीसाठीचं बांधलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>बामणोली रेंजमध्ये वलवणच्या हद्दीत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा मृत्यू नैसर्गिकही असू शकतो किंवा त्याची शिकारही झाली असावी. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करीत आहोत.
- पी. ए. शिंदे, वनक्षेत्रपाल