सातारा : माण तालुक्यातील हिंगणी आणि बिदालमधील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील भीतीचे वातावरण कमी झाले आहे. तर सध्या शिरवळमधील मृत कावळ्यांचा अहवाल भोपाळहून येणे बाकी आहे.
जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात हणबरवाडी, खंडाळा तालुक्यातील मरिआईवाडी आणि माण तालुक्यामधील हिंगणी व बिदालमध्ये काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने या मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. दोन दिवसांपूर्वीच हणबरवाडी आणि मरिआईचीवाडीतील कोंबड्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार हणबरवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर मरिआईचीवाडीतील पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मरिआईचीवाडीतील ४७९ कोंबड्यांना शास्त्रोक्त पध्दतीने मारुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
गुरूवारी सकाळी माण तालुक्यातील दोन गावांतील मृत कोंबड्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार हिंगणी व बिदाल येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे ग्रामस्थ व शेतकºयांतील भीतीही कमी होण्यास मदत झाली आहे. तर शिरवळमध्ये दोन कावळे मृत झाले होते. त्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल येणे बाकी आहे.
जिल्ह्यातील मरिआईचीवाडीमधील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण, इतर तीन गावांतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे. माणमधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. - डॉ. अंकुश परिहार, उपायुक्त जिल्हा पशूसंवर्धन विभाग