सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बिगुल वाजण्याआधीच विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तसेच टीका-टिप्पणीच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीमधील उट्टे काढण्याच्या उद्देशाने आता नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडताना पाहायला मिळतात. आगामी काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता दिसत आहे.
कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. 'सातारा तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो, हे कोण काहीजणांना सोसत नाही, त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. हीच मंडळी उदयनराजेंच्या आणि माझ्या कानाला लागून आमच्यात वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मी देखील भाऊसाहेब महाराजांचा मुलगा आहे, हे त्यांनी विसरू नये. ज्या उदयनराजेंना लोक घाबरतात, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून मी निवडून आलेला आहे. मी कुणालाही घाबरत नाही. मी संपलो तरी चालेल पण माझ्या वाकड्यात शिरनाऱ्यांना मी संपवल्याशिवाय राहणार नाही,' असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले होते.
याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे एका कार्यक्रमामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनीदेखील प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'माझा आणि शिवेंद्रसिंहराजे यांचा कसलाही वाद नाही. तालुक्यातील कार्यकर्त्यांना मी भेटत असेल तर कोणाला त्रास होण्याची गरज नाही. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केलेली असताना देखील मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माझ्या मनात जर खोट असती तर मी सातारा जावळी इथूनच लढलो असतो. आगामी काळामध्ये पक्षवाढीसाठी संघर्ष अटळ आहे. पक्षासासाठी मला संघर्ष करावाच लागणार आहे.'
दरम्यान, एकेकाळी एकाच पक्षांमध्ये राहून जिल्ह्यातील सत्तास्थानांवर ताबा मिळवण्यासाठी एकत्र संघर्ष करणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात बाह्या वर करून उभे आहेत. विधानसभेनंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रणांगण याला कारणीभूत आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक खेचून भाजपच्या ताब्यात आणण्याचे धोरण भाजपने ठरवलेले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्षाची किनार या वादामागे आहे. एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेले नेते आता पक्षीय राजकारणाच्या संघर्षात भरडले जाताना दिसत आहेत.
काय म्हणाले होते हे नेते?
माझ्या मागं मला कोण त्रास देत असेल तर त्याला समोर जाऊन मी संपवणार. काटा काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी सुद्धा काट्याने काटा काढेन. कोणी आडवे असेल तर मी पण आडगा आहे.- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा -जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे सूचना मला होती. मात्र माझ्या मनात कोणतीही खोट नव्हती. मी माझ्या कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली. शिवेंद्रसिंहराजे यांच्या बद्दल माझ्या मनात कोणताही वैरभाव नाही. मात्र आगामी काळात पक्षासाठी संघर्ष करावा लागणार आहे.- आमदार शशिकांत शिंदे