साताऱ्यात पाणीटंचाई; रिकामी भांडी घेऊन नागरिक रस्त्यावर
By सचिन काकडे | Published: March 6, 2024 04:57 PM2024-03-06T16:57:07+5:302024-03-06T16:57:22+5:30
सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी ...
सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी बुधवारी सकाळी रिकामी भांडी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला. या आंदोलनाची माहिती मिळताच पालिकेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
सातारा शहरात उन्हाचा तडाखा सुरू झालेला असताना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यातही पालिकेकडून आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. या कपातीमुळे नागरिक आधीच हैराण झाले असताना कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. पालिकेचा टँकर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिर परिसर, बोकील बोळ तसेच काशी विश्वेश्वर मंदिर परिसर येथील नागरिकांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सलग चार दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने संतप्त झालेल्या यादोगोपाळ पेठेतील महिलांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर भांडी मांडून पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
यादोगोपाळ पेठेला गुरुकुल टाकीमधून पाणीपुरवठा केला जातो. या टाकीची क्षमता दहा लाख लिटर इतकी आहे. परंतु ही टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने भागातील नागरिकांना केवळ १५ ते २० मिनिटे पाणी मिळते. जलवाहिनी व व्हॉल्व्हला लागलेल्या गळतीमुळे हे पाणी देखील मिळणे बंद झाले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजात कोणताही फरक न पडल्याने नागरिकांना आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागली. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते.
या आंदोलनाची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे संदीप सावंत तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी वितरण व्यवस्थेतील सर्व अडचणी दूर केल्या जातील, नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी देण्यात येईल, अत्यावश्यक ठिकाणी टँकर सुरू केले जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यानंतर आंदोलन स्थगित झाले. या आंदोलनात माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.