रक्तदान कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:17+5:302021-05-08T04:40:17+5:30
रामापूर : ‘राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असून, त्यासाठी सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही केलेले ...
रामापूर : ‘राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असून, त्यासाठी सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही केलेले रक्तदान कोरोना रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे,’ असे मत सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.
पाटण येथील कै. भाऊ मोकाशी सभागृहामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. पाटणकर म्हणाले, ‘कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सर्वांनी नियमितपणे मास्क वापरावा, सरकारने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोरोनामुळे अनेक लोकांचा रोजगार बंद पडला आहे, अनेक गरीब कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. आपण आपल्या परिसरातील गरजू व गरीब कुटुंबांना धान्य व जीवन उपयोगी अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करून त्यांची मदत करावी.
राज्यात व जिल्ह्यात कोविड १९ महामारीने उच्छाद मांडला असून, दररोज हजारो रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर याची जशी गरज भासत आहे त्यापेक्षाही अधिक रक्ताची गरज भासत आहेत. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
या वेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष शंकर शेडगे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकर घाडगे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, दूध संघाचे संचालक सुभाष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष गुरुदेव शेडगे, ओबीसी सेलचे अध्यक्ष भय्यासाहेब मुलाणी, तानाजी भिसे, अमर पवार, दीपक घाडगे, विकास गालवे, संग्राम यादव, विजय पवार, विवेक मोहोळकर आदी उपस्थित होते.