महाबळेश्वर : वेण्णातलावात बुडालेल्या महेश दादासाहेब रिटे (वय ३०, रा. जामखेड, जि. अहमदनगर) याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी तलावातून बाहेर काढण्यात ट्रेकर्सच्या टीमला यश आले.दरम्यान, मृतदेहाची अवस्था पाहता मृतदेहाच्या गळ्याभोवती लाल फास आवळल्याच्या खुणा, उजवा डोळा सुजलेल्या अवस्थेत होता. तसेच पाण्यामध्ये मृतदेह राहून सुद्धा शरीरामध्ये पाण्याचा एक थेंबही आढळून आला नसल्याचे समोर येत असून, महेश घातपात झाला की काय, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.याबाबात अधिक माहिती अशी, अहमदनगर येथील जामखेड येथून महेश दादासाहेब रिट (३०), युवराज अर्जून म्हेत्रे (३२), अहमद ईलियास शेख (३६), वसिम तैय्यब शेख (वय, ३० सर्व, रा. जामखेड जि. अहमदनगर) हे चार मित्र महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आले होते. दारूची पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत वेण्णा लेक येथे नौकाविहार करण्यासाठी गेले होते.
नौकाविहार करत असतानाच महेश रिटे हा तरुण बेपत्ता झाला होता. त्याच्या सोबतच्या मित्रांनी सांगितल्या प्रमाणे पोहण्यासाठी महेशने तलावामध्ये उडी मारल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले होते. त्या दृष्टीने येथील महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्स सोबतच पालिका कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून शोध मोहीम सुरु होती.
शुक्रवारी तिसऱ्या दिवशी महेशचा मृतदेह तपास पथकाच्या हाती दुपारी बारा वाजण्याच्या लागला. मृतदेह बघून महेशची आई व जवळचे नातेवाईक,मित्रांनी हंबरडा फोडला. महेशच्या मृतदेहाची पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्या गळ्याला तीन ते चार इंचाचा फास आवळल्या सारखा व्रण दिसत होता.
उजवा डोळा सुजल्याचे दिसत होते. तीन दिवस पाण्यामध्ये असून देखील मृतदेह पाण्याने फुगला नव्हता. त्यामुळे महेशचा मृत्यू पाण्यात बुडण्यापूर्वीच झाला आहे की काय, अशी शंका पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. दोन नावांमुळे संभ्रम..मृताचे नाव महेश दादासाहेब रिटे असे असले तरी कागदोपत्री महेश ज्ञानदेव सरोदे असे नाव असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे खऱ्या महेशच्या नावाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.