कुत्र्याची पिल्ले चोरणारे दोघे अटकेत, सातारा पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:16 AM2019-04-22T10:16:59+5:302019-04-22T10:18:09+5:30
सातारा : जर्मन शेफर्ड जातीची कुत्र्याची तीन पिल्ले चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांना अटक केली. ...
सातारा : जर्मन शेफर्ड जातीची कुत्र्याची तीन पिल्ले चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीची तीन पिल्ले ताब्यात घेण्यात आली असून, ही पिल्ले संबंधित मालकाच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
विकी युवराज अडसूळ (वय २१), अनिरुद्ध वसंत खराशीकर (वय २०, दोघे रा. शाहूनगर सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. सुधीर शिंदे (रा. विलासपूर, सातारा) यांनी जर्मन शेफर्ड जातीची कुत्री पाळली होती. या कुत्रीला २० फेब्रुवारीला नऊ पिल्ले झाली होती. त्यापैकी काही पिल्ले त्यांनी इतरांना दिली होती. सध्या त्यांच्याकडे तीन पिल्ले होती. दरम्यान, दि. १९ रोजी रात्री अज्ञातांनी ही पिल्ले चोरून नेली. याबाबत डॉ. शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केल्यानंतर विकी आणि अनिरूद्ध या दोघांसह एका अल्पवयीन मुलाने ही पिल्ले चोरून नेल्याची माहिती या टीमला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पिल्ले चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून तिनीही पिल्ले ताब्यात घेतली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे, पोलीस नाईक निलेश गायकवाड, अनिल स्वामी, धीरज कुंभार, संतोष भिसे, अविनाश चव्हाण, पंकज ठाणे, सुनिल भोसले, मुनिर मुल्ला यांनी केली.