जगदीश कोष्टी, सातारा : मेढा-तुळजापूर बस मद्यधुंद अवस्थेत चालविल्याप्रकरणी नितीन गजानन मोरे या चालकाला निलंबित केले आहे. ही कारवाई राज्य परिवहन महामंडळाच्या सातारचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी केली. भविष्यात असे चालक आढळल्यास संबंधित ठिकाणचे वाहतूक नियंत्रक, संबंधित वाहकालाही कारवाईला सामोर जावे लागेल, असा इशारा थोरात यांनी दिला आहे.याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगारातील चालक नितीन गजानन मोरे हे दि. ३० सप्टेंबर रोजी तुळजापूर-मेढा ही बस घेऊन साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी त्यांनी मद्यमान केले होते. पेनूर हद्दीत आले असता, गाडी वेडीवाकडी चालवत होते. त्यामुळे गाडीत ड्यूटीवर असलेल्या वाहकाला संशय आल्याने त्यांनी गाडी तेथेच थांबविण्यास सांगितले. त्यावेळी मोरे यांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. वाहकाने प्रवाशांच्या मदतीने मोरे यांना गाडीत आणून झोपवले अन् प्रवाशांना पर्यायी गाड्यांनी पुढे पाठवून दिले. या घटनेनंतर वाहकाने मेढा व पंढरपूरच्या आगार व्यवस्थापकांना याची कल्पना दिली. त्यानुसार सातारचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी सोलापूर विभागाची मदत घेऊन तेथील मार्ग तपासणी पथकाला तेथे पाठविले. त्यावेळी खात्री करून प्रवाशांच्या जवाब नोंदवून घेऊन मोहोळ येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळीही मोरे यांनी मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. सोलापूर विभागातून मार्ग तपासणी पथक, वैद्यकीय अहवाल याच्या आधारे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी मद्यपी चालक नितीन मोरे यांना निलंबित करण्याचा आदेश दिला.
मद्यपी बसचालकांना ‘एसटी’चा ‘ब्रेक’!
By admin | Published: October 12, 2014 12:43 AM