साठा संपल्याने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:31+5:302021-04-08T04:40:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे नियोजन केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस मिळण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे नियोजन केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यातील अडीच लाखांवर नागरिकांना लसीकरण झाले. पण, आता लसीचा साठाच संपल्याने वेगाने सुरू असणाऱ्या या मोहिमेलाच ब्रेक लागलाय. त्यामुळे साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण सुरू होणार नाही.
जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीला ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड आणि ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठांना ही लस देण्यात येत होती, तर आता एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनाच कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत आणि घरापासून जवळच लस मिळावी यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी लसीकरणासाठी पूर्ण तयारी केली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर उपकेंद्रांतही लस देण्यासाठी यंत्रणा तत्पर केली. तसेच गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच इतर लोकांचा सहभाग घेण्याचे निश्चित केले. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला वेग आला. पण, अवघ्या दोन-तीन दिवसांतच याला खीळ बसली. कारण, जिल्ह्यात आलेला कोरोनाचा साठा संपला आहे. त्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण करण्यात येणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतरच पुढील लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनाही लसीची प्रतीक्षा असणार आहे.
चौकट :
आठवड्यात ९० हजार जणांना लस...
जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांना कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी व्यापक नियोजन झाले आहे. त्यामुळे मागील आठवड्यात ९० हजार १३६ लोकांना लस मिळाली. तर दररोज २० हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. असे असले तरी ५ एप्रिलला २१ हजार, तर ६ एप्रिल रोजी २७ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली होती, हे विशेष.
कोट :
जिल्ह्यात एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत आहे. प्रशासनाने प्रभावी नियोजन आणि जनजागृती केल्याने लोकांत जागरुकता आहे. त्यामुळे लसीकरणासाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लसीची मागणी शासनस्तरावर करण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ही मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांतही सुरू करण्यात येईल.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
.............................................................