सचिन काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सदर बझार येथील उद्यानासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेवरील झोपड्या व अन्य अतिक्रमणे मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून जमिनदोस्त करण्यात आली. या कारवाईवेळी शाब्दिक वादावादीही झाली; परंतु पथकाने सर्व विरोध झुगारुन जागा ताब्यात घेतली.
सातारा पालिकेच्या माध्यमातून सदर बझार येथील झोपडपट्टीवासियांसाठी घरकुल योजना साकारण्यात आली आहे. घरांचा ताबा मिळाल्यानंतर अनेकांनी आपल्या झोपड्या स्वत:हून रिकाम्या केल्या. मात्र, काहीजणांनी ही जागा अडवून ठेवली होती. मोकळ्या जागेवर कबुतर व वराह पालनही करण्यात आले होते. पालिकेने संबंधित जागा उद्यानासाठी आरक्षित केली आहे. मात्र, या अतिक्रमणांमुळे कामकाजात अनेक अडचणी येत होत्या. प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरअभियंता दिलीप चिद्रे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सोमवारी या जागेची पाहणी करुन सर्व अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारी दुपारी अतिक्रमण निमूर्लन पथकाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह नऊ कर्मचाऱ्यांनी कारवाई मोहीम हाती घेतली.
सदर बझार येथील झोपड्या, घरांचे बांधकाम तसेच कबूतर व वराह पालनासाठी उभारण्यात आलेले शेड जेसीबी व बुलडोझरच्या साह्याने जमिनदोस्त करण्यात आले. उद्यानातील मोठा अडथळा दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला.