बैलगाडी शर्यत समितीचे आंदोलन अखेर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:45 PM2017-10-17T14:45:16+5:302017-10-17T14:50:17+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा होऊन येत्या २४ तारखेला मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने बैलगाडी शर्यत बचाव समितीने दुसºया दिवशी मंगळवारी आंदोलन मागे घेतले.
सातारा , दि. १७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा होऊन येत्या २४ तारखेला मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने बैलगाडी शर्यत बचाव समितीने दुसऱ्या दिवशी मंगळवारी आंदोलन मागे घेतले.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी. केंद्र आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करावा, या मागणी सोमवारी राज्यातील बैलगाडी चालक-मालक संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी प्रवेशद्वारामसोरच सुमारे एक हजार बैल दावणीला बांधण्यात आली होती.
आंदोलनाच्या निमित्ताने साताऱ्यात तळ ठोकून असलेले कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी सकाळी आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर पशुसंवर्धन आयुक्त उमप, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी बैलगाडी चालक-मालकांना विनंती केली.
मंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आंदोलकांच्या व्यथा मांडल्या. यावेळी येत्या २४ आॅक्टोबरला मंत्रालयात यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही आंदोलकांना सकारात्मक चर्चाबाबत लेखी आश्वासन दिल्यामुळे बैलगाडी चालक-मालकांनी आंदोलन अखेर मागे घेतले.