गरिबांच्या शिरावर गॅसचं ओझं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 AM2021-02-20T05:51:55+5:302021-02-20T05:51:55+5:30
केंद्र सरकारकडून इंधन दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने गोरगरिबांना जगणंही अवघड झालं आहे. त्यातच एकच गॅस सिलिंडर असलेल्या ...
केंद्र सरकारकडून इंधन दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने गोरगरिबांना जगणंही अवघड झालं आहे. त्यातच एकच गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकांना काही दिवस वाट पाहावी लागत असल्याने साताऱ्यातील या आजीबाईंना डोक्यावरून टाकी घेऊन जावी लागली. (छाया : जावेद खान)
---------------
शिवजयंती उत्साहात
सातारा : साताऱ्यातील मोतीचौक, शेटे चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी स्वागत कमान लावण्यात आल्यामुळे शिवमय वातावरण तयार झाले होते. अनेकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
----------------------
चौपाटी विस्तारलेली
सातारा : साताऱ्यातील राजवाडा चौपाटी कोरोना काळापासून बंद आहे. त्यानंतर सर्वच दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, राजवाडा चौपाटी अजूनही बंद आहे. दुकानदारांना इतर ठिकाणी जागा दिली असली तरी ती पुरेशी नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे हातगाडेधारक इतर ठिकाणी जात आहेत.
------------------------
सीसीटीव्हीचा ना धाक
सातारा : साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरमधून अनेक वाहनचालक उलट्या मार्गाने प्रवास करतात. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही त्याचा धाक कोणालाच नाही. त्यामुळे अजूनही दुचाकीस्वार बिनधास्तपणे उलट्या दिशेने प्रवास करीत आहेत. हे धोक्याचे ठरू शकते.
----------------------------कमानी हौदाला रंग
सातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक कमानी हौदाला गेल्या दोन दिवसांपासून रंगरंगोटी करण्यात येत आहे. यामुळे कमानी हौदाचे रुपडेच बदलणार आहे. यामुळे सातारकरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणचेही सुशोभीकरण करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
साताऱ्यातील बागा बंद
सातारा : साताऱ्यातील बहुतांश बागा कोरोना काळापासून बंद आहेत. काही बागांची या काळातही निगा राखली गेलेली नाही. मोठ्या प्रमाणावर गवत उगवलेले आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे बागांची स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
----------------------
रिकाम्या जागेत वृक्षारोपणाची गरज
सातारा : साताऱ्यातील बहुतांश सोसायट्यांनी काही भाग नगरपालिकेला वृक्षारोपण, बागेसाठी सोडला आहे; पण त्या ठिकाणी कामे न झाल्याने त्या जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे पालिकेने या जागेत झाडे लावावीत. लहान मुलांना खेळण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
-------------व्यसनाधीनतेत वाढ
सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागातील तरुणाईमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यसनाधीनता वाढत चालली आहे. साताऱ्यात जागोजागी असलेल्या ओढ्यामध्ये जाऊन ते मद्यपान करतात. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून व्यसनापासून परावृत्त करावे, अशी मागणी होत आहे.
-------------------------स्वच्छतागृहाचा अभाव
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. मात्र, महिलांसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून विविध शासकीय कामासाठी येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे. प्रशासनाने महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होत आहे.
--------------------एसटीची पुन्हा स्वच्छता
सातारा : काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे एसटीची नियमित स्वच्छता केली जात असली तरी एसटी सतत एका गावातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याने प्रवाशांमध्ये धाकधूक वाढत आहे. एसटीची आणखी स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
-------------------------१९ एसटीची स्वच्छता...
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छता कामगारांकडून नियमित स्वच्छता केली जात आहे. (छाया : जावेद खान)