मलकापूर ते आटकेटप्पा परिसरात महामार्ग रूंदीकरणावेळी सहा ठिकाणी ओढ्यांमधील पाण्याच्या प्रवाहासाठी मोऱ्यांची निर्मिती केली आहे. महामार्ग व उपमार्गालगत दोन्ही बाजूला सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाले खोदले आहेत. मात्र, या नाल्यात टाकलेला कचरा व मुख्य ओढ्यांवर झालेले अतिक्रमण यामुळे ठिकठिकाणी नाले तुंबले आहेत. मलकापूर येथेही भारत मोटार्ससमोर गटरचे घाण पाणी रस्त्यावर पसरल्याने तलाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, तर नाल्यातील घाण रस्त्यावर पसरल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या परिसरातील बहुतांशी ओढ्यांवर अतिक्रमण झाले आहे. मोऱ्यांमध्ये कचरा टाकून तुंबल्याने ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अनेक ठिकाणी रस्त्यावरूनच प्रवाहित झाला आहे.
पावसाळा संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही नांदलापूर येथे जखीणवाडी ओढा उपमार्गावरूनच वाहत आहे. या ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची पोती टाकली आहेत. कचऱ्याने मोऱ्या तुंबल्या आहेत. अशा तुंबलेल्या मोऱ्या रिकाम्या करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नैसर्गिक ओढे व नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. अनेक भुयारी नाल्यात कचरा अडकल्याने नाले ठिकठिकाणी तुंबले आहेत. त्यामुळे उपमार्ग जलमय झाले आहेत.
- चौकट
स्थानिकांचा विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास
उपमार्गावर पाणी साचल्यामुळे स्थानिकांना नाइलाजास्तव आपला जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बरेच दिवस उपमार्गावर साचलेल्या पाण्यातूनच ग्रामस्थांना ये-जा करावी लागत असून, संबंधित विभाग गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच ठिकठिकाणी उपमार्गावर धोकादायक खड्डे पडल्याने अपघात घडत आहेत. उपमार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो : १७केआरडी०२
कॅप्शन : नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे नाले तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी उपमार्गावर साचत असून, या मार्गावरून स्थानिकांना धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. (छाया : माणीक डोंगरे)