उमेदवार आपलाय...मतदानाला यायला लागतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:56+5:302021-01-09T04:32:56+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : शहरांत राहणाऱ्या ग्रामस्थांना फोनी - फोनी सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त ...

The candidate is yours ... you have to come to the polls! | उमेदवार आपलाय...मतदानाला यायला लागतंय!

उमेदवार आपलाय...मतदानाला यायला लागतंय!

Next

ग्रामपंचायत निवडणूक : शहरांत राहणाऱ्या ग्रामस्थांना फोनी - फोनी

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत पाहायला मिळते. नोकरी-व्यवसायानिमित्त गावाबाहेर राहतात; परंतु त्यांचे मतदान गावातच असल्याने उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते अशा मतदारांना फोना फोनी करून निवडणुकीला आपला उमेदवार उभा राहिला आहे, मतदानाला यायला लागतंय, अशी हक्काने साद घालत आहेत.

जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतींची प्रत्यक्षात निवडणूक लागलेली आहे तर अंशतः बिनविरोध झालेल्या ९८ ग्रामपंचायतीमध्ये एक ते दोन जागांसाठी निवडणूक लागल्याने त्याठिकाणी प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पॅनल प्रमुखांनी जोरदार तयारी केलेली आहे. वेगवेगळ्या पॅनलचे वेगवेगळे उमेदवार वेळा ठरवून घर टू घर प्रचार करत आहेत. काही ठिकाणी पॅनल प्रमुखांच्या नेतृत्वाखाली गाठीभेटी देखील घेतल्या जात आहेत.

दरम्यान, जे मुळचे गावातले आहेत, परंतु कामानिमित्त इतर शहरांमध्ये राहतात, त्यांची नावे मतदार यादीत असल्याने उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते त्यांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. अनेकांच्या मोबाईलवर अनोळखी फोन येत असल्याने सुरुवातीला ते उचलले जात नाहीत, मात्र दोन-तीन वेळा ट्राय केल्यानंतर फोन उचलला जातो. मी अमुक अमुक बोलतोय १५ जानेवारीला मतदान आहे, आपल्या घरातला उमेदवार आहे. तुमची चार मत आहेत. मतदानाला यायच चुकवायचं नाही.अमुक अमुक चिन्हा समोरील बटन दाबून आपल्याच उमेदवाराला विजयी करायचं, अशी साद घातली जात आहे. जे मतदार आढेवेढे घेतील त्यांना वाहनाची सोय देखील करू, असे आश्वासन दिले जात आहे.

प्रवासाची सोय वरून चहा, नाष्टा आणि दुपारचे जेवण मिळाले तरच मतदानाला येऊ असे म्हणणारे काही महाभाग मतदार देखील वेळ साधून उमेदवारांची गोची करताना दिसत आहेत. ''अडला हरी धरी गाढवाचे पाय'' या म्हणीची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्त उमेदवारांना येत आहे. निवडणुकीचे मतदान गोपनीय पद्धतीने होते. आपण ज्या मतदाराला सर्व सोय करून घेऊन येऊ तो मतदार आपल्यालाच मतदान करील याची खात्री नसली तरीदेखील उत्साही उमेदवार मतदारांचा हट्ट पुरवत आहेत.

चौकट

गावचे राजकारण आताच चावडी बाहेर

निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांचे पाच वर्ष काटशहाचे राजकारण सुरू असते. ऐन निवडणुकीत विळ्या भोपळ्याचे वैर सुरू होते. लोकशाही आहे म्हटल्यावर निवडणूक आली. निवडणूक म्हटल्यावर मतदान! पाच वर्षे चावडीत सुरू असलेले राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने गावच्या वेशीबाहेर पोचल्याचे पाहायला मिळते.

चौकट

६५४ गावांत प्रचाराचा धुरळा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी सात दिवस उरले आहेत. गावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडालेला पाहायला मिळतोय. एकमेकांचे विरोधक असणारे उमेदवार मतदारांकडे हेलपाटे मारताना दिसत आहेत. सकाळी उठून लवकर गुरांची कामे आणि दुपारी शेतात काम करून संध्याकाळी विसाव्यासाठी घरी येणारे मतदार दोन्ही बाजूच्या उमेदवारांना आम्ही तुमचेच असे म्हणत आहेत.

पॉइंटर

निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती : ८७८

एकूण सदस्य संख्या : ७,२६६

निवडणुकीसाठी शिल्लक अर्ज : ९,५२१

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती : १२३

अंशतः बिनविरोध ग्रामपंचायती : ९८

प्रत्यक्षात मतदान होणार या ग्रामपंचायती : ६५४

Web Title: The candidate is yours ... you have to come to the polls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.