वेळे : वाई तालुक्यात खंबाटकी घाट उतरताना मंगळवारी रात्री वेळे गावच्या हद्दीत कारने पेट घेतला. यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारमधील प्रवासी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत माहिती अशी की, मुंबईहून वाईला जाणारी कार घाट रस्त्यात उतारावरील एका वळणावर आली. त्यावेळी कारने अचानक पेट घेतला. इंजिन गरम होऊन शॉर्टसर्किटमुळे कारने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार पेटल्याचे लक्षात आल्यावर चालकाने रस्त्याच्या एका बाजूस गाडी उभी केली. त्यानंतर कारमधील दोन्ही व्यक्ती तत्काळ बाहेर पडल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या व्यक्ती मुंबईहून वाईला जात होत्या. पेटलेल्या कारमुळे रस्त्याकडेचे झाडही पेटले. ही आग संपूर्ण परिसरात फोफावली. याची माहिती वेळे गावातील लोकांना समजली. त्यानंतर ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी गेले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत घाटातील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने ही आग विझविली. तसेच वाई नगरपालिकेचा अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाला. या आगीत गाडी संपूर्णत: जळून खाक झाली. गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास भुईंज पोलीस करीत आहेत.