न्याय देणारेच अडकले लाचप्रकरणात, सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चाैघांवर गुन्हा दाखल

By दीपक शिंदे | Published: December 11, 2024 01:24 PM2024-12-11T13:24:42+5:302024-12-11T13:26:27+5:30

जामीन देण्याचे प्रकरण : पाच लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्न

Case against Satara District Sessions Judge and three others for trying to get bribe of five lakh rupees to grant bail | न्याय देणारेच अडकले लाचप्रकरणात, सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चाैघांवर गुन्हा दाखल

न्याय देणारेच अडकले लाचप्रकरणात, सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चाैघांवर गुन्हा दाखल

सातारा : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार ३, ९ तसेच १० डिसेंबर रोजी घडला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तक्रादार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली.

तसेच १० डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Case against Satara District Sessions Judge and three others for trying to get bribe of five lakh rupees to grant bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.