लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विसावा नाक्यावरील एका प्रसिद्ध माॅलच्या चाैथ्या मजल्यावरून एक मुलगी खिडकीतून खाली पडते. त्याचवेळी एक मुलगा तिचा पाय पकडतो. तो मदतीची याचना करतो; पण शेजारी एक कार्यक्रम सुरू असल्यामुळे त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. शेवटी त्या मुलाच्या हाताला घाम फुटल्याने त्याचा हात सुटला आणि क्षणात ती मुलगी चाैथ्या मजल्यावरून खाली पडली अन् यात तिचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, विसावा नाक्यावर एक माॅल आहे. या माॅलच्या चौथ्या मजल्यावर एक कॅफे आहे. या कॅफेमध्ये दहावीतील मुले आणि मुली एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरून एक मुलगी अचानक खिडकीतून खाली पडते. इतक्यात एका मुलाने त्या मुलीचा पाय पकडला. मुलीचे डोके खाली पाय वर, अशी स्थिती होती.
हृदयाचा ठोका चुकविणारे हे दृश्य या इमारतीच्या आजूबाजूचे लोक पाहत होते. नेमके काय करावे, हे कोणालाच सुचत नव्हते. तो मुलगा मात्र वाचवा, वाचवा, असे ओरडत होता. परंतु, त्याचा आवाज कार्यक्रमाच्या गोंगाटात विरून गेला. त्याने एकट्यानेच मुलीचा लोंबकळलेल्या स्थितीतील पाय धरला होता. क्षणात काहीही होऊ शकतं, या विचाराने त्या मुलाची पाचावर धारण बसली होती.
अर्धा मिनीटही तो मुलगा तग धरू शकला नाही. हाताला घाम आणि मुलीच्या वजनामुळे त्याचा हात सुटला, तशी मुलगी सुमारे ५० फुटांवरून खाली पडली. यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. जेव्हा त्या मुलीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्या मुलीची ओळख पटली. त्या मुलीचे नाव श्रेया श्रीकांत रासणे (वय १६, रा. शाहूपुरी गडकर आळी, सातारा) असे असल्याचे समोर आले आहे.
लोक मदतीसाठी जाण्यापूर्वीच सर्व काही संपलं
- खिडकीतून मुलगी खाली लोंबकळतेय. मुलाने तिचा पाय धरलाय, हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक ओरडू लागले.
- लोक त्या मुलाच्या मदतीसाठी इमारतीमधून धावू लागले. परंतु चौथ्या मजल्यावर पोहोचेपर्यंत त्या मुलाच्या हातून ‘त्या’ मुलीचा पाय निसटला होता.
- काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने नागरिक मात्र, अक्षरश: हबकून गेलेत.
‘ती’ कशी पडली, हे मात्र गुलदस्त्यातच
इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरून श्रेया खाली कशी पडली, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. सातारा शहर पोलिसांनी संबंधित इमारतीमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"