सातारा : येथील क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान यांच्या शासकीय वसाहतीमधील घरावर पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांना अडीच हजारांच्या मार्क केलेल्या नोटासह तसेच काही रोकडही आढळून आली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशन कार्यालयामध्ये उपनिरीक्षक एम. आय. बागवान हे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या विरोधात पुणे सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यात येऊन बागवान यांना अटक केली. त्यानंतर त्यांना ते राहत असलेल्या शासकीय वसाहतीमधील घरी घेऊन गेले.
बुधवारी रात्री घरावर छापा टाकला. घरातील एका बॅगमध्ये अडीच हजारांच्या विशिष्ट पद्धतीने मार्क केलेल्या नोटा आणि अन्य रोकडही सापडली आहे. बागवान यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुण्याला नेले असून, त्यांच्याकडे पैशासंदर्भात चौकशी सुरू आहे. मात्र त्यांच्याविरोधात कोणी लाचेच्या मागणीची तक्रार केली, हे अद्याप समोर आले नाही.दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा रेल्वे स्टेशन वसाहतीमध्ये रेल्वे विभागाची बुलेट जाळण्यात आली होती. ही बुलेट उपनिरीक्षक बागवान यांच्यासह काही अधिकारी वापरत होते. या प्रकरणातूनही त्यांच्याविरोधात तक्रार झाली असावी, असेही बोलले जात आहे.