चाफळ येथील विविध ठिकाणचे व सैनिक सहकारी बँकेसमोरील विजेचा खांब गत अनेक वर्षांपासून उभा आहे. तो खांब जमिनीपासून पूर्णपणे गंजला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तो पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक खांब बदलावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी वीज वितरण कंपनीकडे केली आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी गंजलेले खांब पडून अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
गावातील शहीद सैनिक सहकारी बँकेच्या समोरील, मुस्लिम समाज वस्ती, नांदलाई देवी मंदिर, राम मंदिराशेजारील विजेचे खांबही जमिनीत गंजलेले आहेत. सध्या फक्त सिमेंट व खडी टाकून ते मुजवले आहेत. मात्र, जोरदार वारे आल्यास ते कोणत्याही क्षणी पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी खांब मध्येच वाकलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे विजेच्या तारा अनेक घरांवर लोंबकळत असल्याचे पाहायला मिळते. वीज वितरण कंपनीने तातडीने खांब बदलावेत, अशी मागणी सरपंच सूर्यकांत पाटील यांनी केली आहे.