सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो, असे सांगून ५ लाख रुपये घेतल्यानंतरही काम न करता व परत पैसे माघारी न देता, फसवणूक केल्याचा आरोप शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे (रा.वाई) यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात वाई पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.सचिन ससाणे म्हणाले, मी लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहे. दोन महिन्यांपूर्वी पिक्चर करायचा असल्याचे ठरवून त्यासाठी अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांना घेण्यासाठी शिंदे यांचे सहकारी मधुकर फल्ले यांच्यासोबत मी चर्चा केली. प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनाही चित्रपटाची स्क्रिप्ट सांगण्यात आली. कामाचा मोबदला म्हणून प्रति दिवस एक लाख रुपये घेणार असल्याचे ठरले. पाच दिवसांचे काम असल्याने त्या बदल्यात रोख ४ लाख रुपये व १ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पैसे देताना सयाजी शिंदे यांनी व्हाउचरवर सह्या केल्या आहेत. मात्र, व्यवहाराबाबत कॉन्ट्रॅक्ट झाला नाही.चित्रपटाचे काम सुरू झाल्यानंतर स्क्रिप्टमध्ये सयाजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्यास सांगण्यास सुरुवात केली. ही बाब पटली नाही. यातूनच पुढे सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करणार नसून पाच लाख रुपये परत देतो, असे सांगितले. याबाबतचे मोबाइलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग असल्याचे ससाणे यांनी सांगितले. मात्र, पैसे देतो, असे सांगूनही सयाजी शिंदे व मधुकर फल्ले पैसे देत नसल्याने वाई पोलिस ठाण्यात त्याविरुद्ध तक्रार अर्ज देण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली
सिनेअभिनेते सयाजी शिंदेंकडून फसवणूक, चित्रपटात काम करण्यासाठी घेतले पाच लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 1:39 PM