काही दिवसांपासून उंब्रज व परिसरातील काहीजणांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून संबंधितांच्या मित्रांना मेसेज पाठविले जात आहेत. संबंधित ‘हॅकर’ हा संबंधितांशी हिंदी भाषेमध्ये संवाद साधत आहे. मित्राची मुलगी दवाखान्यामध्ये अॅडमिट आहे, तिच्या उपचारासाठी पैसे पाहिजेत, या प्रकारच्या भावनिक गोष्टी सांगून संबंधित मुलीचे दवाखान्यातील फोटो पाठविले जात आहेत आणि या ऑनलाईन अॅपवर तातडीने दहा हजार, पाच हजार, एक हजार रुपये पाठवा, असे या मेसेजद्वारे सांगितले जात आहे.
अनेकजण मित्राच्या अकाऊंटवरून अचानक आलेले असे मेसेज पाहून आश्चर्यचकित होऊन अकाऊंट असलेल्या मित्राला फोन करत आहेत. त्यामुळे अकाैंट हॅक झाल्याचे उघडकीस येत आहे. मात्र, अशा मेसेजमुळे भावनिक होऊन काहींनी संबंधित हॅकरना ऑनलाईन पैसे पाठविलेही आहेत. त्यामुळे अनेकांची आर्थिक फसवणूकही झाली आहे. इथून पुढे फसवणूक न होण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी.
- चौकट
पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
ऑनलाईन पैसे पाठविण्यासाठी संबंधित हॅकर मोबाईल नंबरही बिनधास्त पाठवत आहेत. तो मोबाईल नंबर कोणाचा आहे, हे पोलिसांनी तपासणे गरजेचे आहे. त्यावरून अशी आर्थिक फसवणूक करणाऱ्या हॅकरचा शोध लागू शकतो. पोलिसांनी या प्रकाराचा तपास करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून तसेच मोबाईलधारकांतून होत आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युवकांनीही सावधानता बाळगून, सतर्क राहून आपल्या सर्व ऑनलाइन अॅप्लिकेशनचे पासवर्ड गोपनीय ठेवणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे.