कऱ्हाड : ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या मोबाईलवरून मुलाने फोन करून हॉटेलमध्ये अतिरेकी घुसल्याचे सांगितले आणि मुंबईसह कऱ्हाडातही खळबळ उडाली. मुलाचा हा खोडसाळपणा पालकांच्या चांगलाच अंगलट आला. मुलांकडून मोबाईलच्या होणाऱ्या गैरवापराचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यापूर्वीही अनेक मुलांनी अशी ‘गंमत’ करून पालकांचा जीव टांगणीला लावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.
मोबाईलविषयी मुलांना असलेलं प्रचंड आकर्षण नवीन नाही. पालकांच्या हातात मोबाईल दिसला की, तो मिळविण्यासाठी पूर्वी मुलं हट्ट धरायची. रुसून बसायची; पण ‘ऑनलाइन’ शिक्षणाने त्यांची ही हौस पुरवली. शिक्षणासाठी मुलांच्या हातात ‘स्मार्ट’ फोन आले. मोबाईलद्वारे मुलांनी अभ्यासाचे धडेही गिरवले. मात्र, अभ्यासापेक्षा मोबाईलचा अनेकवेळा अवांतर वापर होत असल्यामुळे पालकही चिंतेत आहेत. मोबाईल द्यावा तर मनमानी वापराची चिंता आणि नाही द्यावा तर अभ्यास कसा होणार, हा प्रश्न. त्यामुळे पालक दुहेरी मनस्थितीत अडकल्याचे दिसते.
तासभर अभ्यास आणि दिवसभर ‘टाइमपास’ असा प्रकार अनेक वेळा मुलांकडून होतो. पालकांनी मोबाईलचा इतर कारणासाठी वापर न करण्याबाबत अनेक वेळा सांगूनही काही मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकांचे दुर्लक्ष होताच त्यांच्याकडून मोबाईलचा मनमानी वापर सुरू होतो. सध्या काही मुलांना मोबाईलची एवढी सवय झाली आहे की, दिवसभर ते त्यामध्ये गुरफटून गेल्याचे दिसते. अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलचा वापर करू नको, असे पालक वारंवार आपल्या मुलांना सांगतात. मात्र, काही मुले वेगवेगळ्या अॅप्लिकेशनच्या आकर्षणामुळे मनमानीपणे मोबाईलचा वापर करतात. आणि ही बाब पालकांसाठी चिंतेची आहे.
- चौकट
वेगवेगळ्या ‘अॅप्लिकेशन्स’ची भुरळ
मोबाईलमध्ये असणारी वेगवेगळी अॅप्लिकेशन्स मुलांना भुरळ घालतात. कार्टुन, गेम, छोटे व्हिडीओ पाहताना मुले हरखून जातात. त्यामुळे त्यांना अभ्यासाचं भान राहत नाही. परिणामी, मोबाईल मुलांसाठी एकप्रकारचे खेळणेच बनला आहे.
- चौकट (फोटो : २७केआरडी०२)
अभ्यासाव्यतिरीक्त मुलांचा मोबाईल वापर
गेम : ३८ टक्के
कॉल : २४ टक्के
व्हिडीओ : १८ टक्के
चित्रपट : १२ टक्के
इतर : ८ टक्के
- चौकट
पालकांनी काय कराव..?
१) अभ्यासावेळीच मुलगा, मुलीच्या हाती मोबाईल द्यावा.
२) मोबाईलवर अभ्यासच सुरू आहे का, हे तपासावे.
३) ‘अॅप्लिकेशन्स’ कोणकोणती आहेत, हे पहावे.
४) गरजेव्यतिरीक्त इतर ‘अॅप्लिकेशन्स’ला ‘सेक्युरिटी पिन’ टाकावा.
५) ‘सर्च इंजिन’ला ‘सेफ सर्च’चा पर्याय निवडावा.
- चौकट
मानसिकतेवर होतोय परिणाम
मोबाईल जेवढा फायदेशिर तेवढाच धोकादायक असतो. ‘ब्राऊजर’वर आॅनलाईन सर्च करताना अनेक विकल्प मुलांसमोर येतात. ते विकल्प योग्य आहेत की नाही, याची कसलीच माहिती मुलांना नसते. मात्र, त्यांच्याकडून वेगवेगळी ‘वेबपेज’ उघडली जातात. त्यामुळे संबंधित ‘साईट’वर असणाºया ‘कंटेन्ट’मुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो.
फोटो : २७केआरडी०१
कॅप्शन : प्रतिकात्मक