मायणी : चितळी, ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले असून, बांधकामाच्या विटाही ढासळू लागल्या आहेत. प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा चितळी ग्रामस्थांनी दिला आहे.चितळी येथे १८८५ मध्ये शाळा सुरू करण्यात आली. या शाळेचे बांधकाम १९६२ मध्ये लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आले. तत्कालीन सरपंच दिवंगत भाऊसाहेब पवार यांच्या काळात जिल्हा परिषदेकडे ही शाळा वर्ग करण्यात आली. तेव्हापासून या शाळेच्या दुरुस्ती, देखभाल करण्यात आली नाही.
बारीक माती मिश्रीत दगड, विटा खाली पडत आहेत. ठिकठिकाणी फरशीही खचली आहे. त्यामुळे या शाळेच्या संपूर्ण खोल्या धोकादायक झाल्या आहेत. तसा दाखलाही बांधकाम विभागाने ९ जानेवारी २०१७ रोजी दिला आहे. ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत असून, यामध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शाळेला नव्या पाच खोल्या मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांच्या वतीने अर्ज करण्यात आला आहे. वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर एका वर्षाने एक खोली मंजूर करण्यात आली. धोकादायक अवस्थेत असलेल्या या शाळेमुळे विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शाळा बंद करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य हिराचंद पवार, सरपंच साधिका पवार, शाळा समितीच्या अध्यक्षा रेखा पवार यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.