मलकापुरात घरपोच भाजीपाल्याला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:13+5:302021-05-08T04:40:13+5:30

मलकापूर : वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मलकापुरात सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा बंद केल्याने गैरसोय होऊ ...

Citizens' response to home-grown vegetables in Malkapur | मलकापुरात घरपोच भाजीपाल्याला नागरिकांचा प्रतिसाद

मलकापुरात घरपोच भाजीपाल्याला नागरिकांचा प्रतिसाद

Next

मलकापूर : वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मलकापुरात सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा बंद केल्याने गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने भाजीपाल्याच्या घारपोच सुविधेसाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले आहे. नगरसेवकांसह कर्मचारी व स्वयंसेवकांनी पहिल्याच दिवशी पालिकेचे शंभर रुपयांचे भाजीचे किट शंभर घरांत पोहोचविल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

मलकापूर शहरात मंगळवारपासून संचारबंदीच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. यात रुग्णालय व मेडिकल वगळता इतर जीवनावश्यक सेवा बंद ठेवल्या आहेत. संचारबंदीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र शहरातील नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेऊन पालिकेने आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही पालिकेने केवळ १०० रुपयांत भाजीपाला किट तयार केले आहे. ते पालिकेमार्फत घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. या घरपोच सेवेसाठी एक टास्कफोर्स तयार केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह शहरातील सर्व प्रभागांतील सेवाभावी संस्थांमधील कार्यकर्त्यांचा स्वयंसेवक म्हणून समावेश केला आहे. पालिकेच्या कार्यालयासह प्रभाग नोडल अधिकाऱ्यांकडे पहिल्याच दिवशी शंभर किटची मागणी झाली होती.

नगरसेवक सागर जाधव, जयंत कुराडे, हणमत शिंगण, सावकर देवकुळे आदींनी आगाशिवनगर परिसरात ५० तर हेमंत पलंगे, सुभाष बागल यांच्यासह स्वयंसेवकांनी मलकापूर परिसरात ५० भाजीपाला किट तयार केली. टास्कफोर्सच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी शंभर भाजीपाला किटची शंभर घरांत घरपोच सेवा दिली.

(चौकट)

सर्वसमावेशक सात भाज्यांचे किट

पालिकेने तयार केलेल्या किटमध्ये टोमॅटो १ किलो, वांगी १ किलो, गवारी पावशेर, भेंडी पावशेर, फ्लॉवर, आले व दोन लिंबू या पालेभाज्यांचा समावेश आहे.

(कोट)

शेतकऱ्यांचा माल पालिकेने खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत आहे. तर माफक दरात भाजीपाला किट नागरिकांना घरपोच मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचेही हित आहे व नागरिकांचेही हित आहे. याचा नागरिकांनी घरात राहूनच फायदा घ्यावा व कोरोना थांबवावा.

- नीलम येडगे, नगराध्यक्षा, मलकापूर

फोटो : मलकापुरात पालिका कर्मचारी व स्वयंसेवकांनी मलकापूर येथील नागिरकांना भाजीपाला किट घरपोच दिले. (छाया : माणिक डोंगरे)

Web Title: Citizens' response to home-grown vegetables in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.