महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज, बुधवारी पहाटे पहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा ०३ ते ०४ अंश पर्यंत खाली गेला असल्याचे दिसून आले.वेण्णालेक परिसरामध्ये आज पहाटेच्या सुमारास चारचाकी गाड्यांच्या टपांवर, पानांवर, वेण्णालेक नौकाविहारासाठी ये जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी जेटीवर काही प्रमाणात हिमकण जमा झाल्याचे चित्र दिसले. तर लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात देखील पाने, झाडेझुडपांवर देखील हिमकण पाहावयास मिळाले. या हंगामातील ही पहिलीच घटना आहे.गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले असून वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.
Satara News: थंडीचा कडाका; महाबळेश्वर परिसरात दवबिंदू गोठले..बर्फाची चादर
By दीपक शिंदे | Published: January 11, 2023 1:05 PM