पेट्री : परळी खोऱ्यातील डोंगरमाथ्यावर निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री घाटाईदेवी मंदिर परिसरात रविवारी सकाळी राजूभय्या मित्रसमूह व कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जवळ जवळ तीस पिशव्या कचरा, बाटल्या जमा करून परिसर कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यात आला.
श्री घाटाईदेवी मंदिर परिसर निसर्गसंपदेने नटला आहे. एकीकडे तीर्थक्षेत्र स्थळाचा विकास होत असताना दुसरीकडे मंदिर परिसरातील देवीच्या वनराईत चुली पेटवून ओल्या पार्ट्या केल्या जात होत्या. सुटीच्या दिवशी काही हुल्लडबाज याठिकाणी ओपन बार भरवत असल्याचे चित्र दिसून आले होते. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच, पेटवलेल्या चुली, प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसत होता. या तीर्थस्थळाचे महत्त्व, निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलून बेशिस्त व विघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक, स्थानिकांतून करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर येथील परिसराचे पावित्र्य राखले जावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या स्वच्छता मोहीम राबविण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सकाळी ७ वाजेपासून स्वतः राजू भोसले व त्यांच्या मित्रसमूह तसेच कास पठार कार्यकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री घाटाईदेवी परिसरात असंख्य दारूच्या बाटल्या व घनकचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष, सदस्य, कर्मचारी, घाटवण ग्रामस्थ, ट्रस्टचे विश्वस्त, राजूभय्या मित्रसमूह बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट
श्री घाटाई मंदिर परिसरात यापुढे कचरा, ओल्या पार्ट्या करताना कोणी आढळल्यास त्याला कचरा उचलण्यास भाग पाडले जाईल, अशी माहिती कास पठार कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली.
कोट:
परळी विभागातील श्री घाटाई मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. मागील आठवड्यात या परिसरात ओल्या पार्ट्या तसेच दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच पाहता परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचे निदर्शनास आले होते. येथील पावित्र्य राखले जावे यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
- राजू भोसले,
माजी जिल्हा परिषद सदस्य, सातारा.
फोटो
२१पेट्री
परळी विभागातील घाटाई मंदिर परिसरातून राजू भोसले मित्रपरिवार आणि कास पठार कार्यकारी समिती यांच्या वतीने रविवारी मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा केला. (छाया : सागर चव्हाण)