शाळाबाह्य गुरुजी : तीन प्रगती जाधव-पाटील --सातारा : नोकरीच्या दुर्गम ठिकाणी विद्यादानाचे काम करण्यासाठी जाणाऱ्या अनेक शिक्षकांच्या शरीराची दुखणी या दळणवळणाने वाढविली आहेत. दुर्गम भागात काम करून अतिउत्कृष्ट सेवेचा मान मिळवून शासनाचे कौतुक पदरी पाडून घ्यायचे म्हटले तरी ते अशक्य असल्याने शिक्षकांमध्ये काम करण्याचा उत्साह दिसेनासा झाला आहे. शासनाने शिक्षण हक्क कायदा केला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, असे निकष लावले गेले. त्याबरोबरच शाळेतही भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम अघोषितपणे शिक्षकावरंच येऊन पडले. स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि अध्ययनाबरोबरच अशैक्षणिक कामांचे ओझे पेलणाऱ्या शिक्षकांची पाचावर धारण बसली आहे. नोकरी करवतही नाही आणि सोडवतही नाही, अशी अवस्था सध्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची झाली आहे.राज्य शासनाने अनेक योजना शिक्षकांसाठी आणल्या होत्या; पण वेळोवेळी शिक्षक विरोधी जाणाऱ्या धोरणांचा आता शिक्षकांनाही उबग आला आहे. लोकांच्या मुलांना शिकविण्यासाठी आपल्या मुलांवर होणारे अन्याय, नोकरीसाठी परगावी जावे लागत असल्यामुळे प्रवासातूनहोणाऱ्या चिडचिडीचा परिणाम कुटुंबावरही होत आहे. जिल्ह्यातील साठ टक्क्यांहून अधिक शिक्षक प्रवास करणारे आहेत. दळणवळणाच्या सुविधांची आबाळ असल्यामुळे अनेक शिक्षकांना दुचाकीवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे घरी येईपर्यंत कुटुंबीय चिंतेत असतात. या सोयी झाल्या कायमच्या बंददेशाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षकांना पावलोपावली प्रोत्साहन देता यावे म्हणून सलग पाच वर्षे अतिउत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जायचा. गोपनीय अहवालाच्या आधारावर शिक्षकांची निवड केली जायची. त्यात यशस्वी होणाऱ्या शिक्षकाला दोन वेतनवाढी मिळायच्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये अतिशय निकोप पध्दतीने गुणवत्तापूर्ण स्पर्धा व्हायची. गेल्या काही वर्षांपासून ही योजनाच बंद झाली आहे.ज्या शिक्षकांना राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतात, त्यांना मिळणारी विशेष वेतनवाढही थांबविण्यात आली आहे.कुटुंबातील कोणी आजारी असेल तर त्याचा विमा पूर्वी शासनाच्या वतीने केला जात होता. त्यामुळे निर्धारित दवाखान्यांमध्ये औषधोपचार मोफत केले जात होते. आता आधी खर्च करा आणि मग बिले जोडा असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक शिक्षकांना या खर्चाची प्रतिपूर्ती अद्याप मिळालीच नाही. शिक्षक हक्क कायद्याचा सोयीनुसार लावला गेलेला अर्थ, शिक्षक संघटनांची श्रेयवादासाठी चाललेली धडपड, प्रत्येक शैक्षणिक धोरणाविरोधात न्यायालयात जाण्याचा वाढलेला ओघ, खासगी शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, प्रयोगशीलतेसाठी सतत बदलत जाणारे शैक्षणिक धोरण, शिक्षक भरती व बदली धोरणातील बदल पटसंख्येतील गळती यामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यात निर्माण होत असलेली दरी दूर करण्यासाठी प्रशासन, पर्यवेक्षण आणि समाज या घटकांनी शिक्षकाचे मनोबल वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. - सुनील खंडाईत, शिरगाव, जि.प. शाळा, कऱ्हाड
दळणवळणात होतेय शिक्षकांची चाळण
By admin | Published: October 13, 2015 10:00 PM