आरेवाडीत कोरोना लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:39 AM2021-04-07T04:39:46+5:302021-04-07T04:39:46+5:30
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सध्या टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील सर्वांना सध्या ही लस देण्यात येत ...
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सध्या टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील सर्वांना सध्या ही लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक शहरांत तसेच गावोगावी मोफत लसीकरण करण्यात येत आहे. अनेक प्राथमिक केंद्र, उपकेंद्रात लसीकरणाची मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कऱ्हाड तालुक्यातील सुपने आरोग्य केंद्रात मार्च महिन्याच्याअखेरीस लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. आरेवाडी येथील उपकेंद्रात ग्रामस्थांना ही लस देण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक उपकेंद्रांना दर सोमवारी लस देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. दिवसाला १५० ग्रामस्थांना लस देण्यात येत आहे. गमेवाडी, आरेवाडी, उत्तर तांबवे, पाठरवाडी, साजूर या गावांतील ग्रामस्थांना आरेवाडीच्या उपकेंद्रात लस देण्यात येत आहे. लसीकरणाचा प्रारंभ गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच रेश्मा विजय यादव, अविनाश आनंदराव देसाई, गटप्रवर्तक शिवतरे, आरोग्यसेविका अश्विनी यादव, आशा सेविका आशा देसाई, सुजाता पवार, श्रीकांत बाबर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.