कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, सुजित मोरे, पांडूरंग होनमाने, गिरीश पाटील, प्रमोद पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक धोंडीराम जाधव म्हणाले, गेल्या गळीत हंगामावर कोरोना विषाणू या आपत्तींचे संकट असताना सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी पार पाडू शकलो. या कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवसायांना अडचणी आल्या आहेत. कोरोनामुळे कारखान्यापुढेही अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु तोडणी वाहतूकदार यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी पार पडला आहे. गेल्या पाच वर्षांत ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची येणेबाकी शून्य रुपये आहे. हा कृष्णा कारखान्याने साखर कारखानदारी समोर घालून दिलेला एक आदर्श आहे.
यावेळी मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरव्हायझर विजय मोहिते, लेबर अॅन्ड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम आदीसह ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार उपस्थित होते. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी प्रास्ताविक केले. संचालक पांडुरंग होनमाने यांनी आभार मानले.
फोटो ओळी-
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ करताना संचालक धोंडीराम जाधव, दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, सुजित मोरे व इतर मान्यवर.