तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती : रामचंद्र शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 AM2021-02-24T04:41:03+5:302021-02-24T04:41:03+5:30
सातारा : जिल्ह्यात तृतीयपंथीय कल्याणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. समिती स्थापन करून ...
सातारा : जिल्ह्यात तृतीयपंथीय कल्याणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. समिती स्थापन करून तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केल्या.
तृतीयपंथी यांच्या समस्येबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक अपर जिल्हाधिकारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला समाजकल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे उपस्थित होते.
तृतीयपंथीयांच्या आधारकार्ड, रेशनिंग कार्ड यासारख्या मूलभूत बाबींसाठी संबंधित प्रांत, तहसीलदार यांना सूचना देऊन दाखले उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात येईल, असे सांगितले तसेच वैद्यकीय अडीअडचणी, राहण्याच्या अडचणी (निवास) सोडविण्याबाबत सकारात्मता दाखवली.
सहाय्यक आयुक्त उबाळे यांनी तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण पूर्ण करून शासनाच्या वतीने येणाऱ्या योजनांचा लाभ देण्याचे १०० टक्के प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.