कंपनीच्या वायू प्रदूषणाने जनजीवन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:29+5:302021-04-09T04:41:29+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील अजनुज कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या होणाऱ्या केमिकल निर्मितीमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण आणि ध्वनी ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील अजनुज कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या होणाऱ्या केमिकल निर्मितीमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने जीवितास धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. याबाबत तातडीने कारवाई करावी, यासाठी प्रशासनाकडे धाव घेऊन मागणी केली.
अजनुज येथील गावठाणात असलेल्या एस. एन. कोटिंग कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता येथे केमिकल उत्पादन केले जाते. त्यासाठी खनिजांचे स्फोट होत असल्याचे आवाज होतात. यामध्ये येथून बाहेर पडणारी काजळी व मोठमोठ्या आवाजामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही काजळी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आहे, तसेच केमिकलची दुर्गंधी सभोवताली पसरल्याने जगणे असह्य बनल्याने, स्थानिक ग्रामस्थांनी खंडाळा तहसीलदारांकडे तक्रार केली होती. याबाबत कार्यालयाकडून प्रदूषण मंडळाकडे कळविण्यात आले आहे. मात्र तीन महिने होऊन गेले तरी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यांचा डोळेझाकपणा लोकांच्या जिवाशी खेळ बनत आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
गावात पूर्वीची जुनी कंपनी नव्या नावाने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या केमिकल निर्मिती केली जाते. स्फोटकांचे भयंकर आवाज व दुर्गंधी परिसरात पसरल्याने लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत योग्य ती कारवाई करून स्थानिकांना न्याय मिळावा, हीच अपेक्षा आहे.
- पांडुरंग आवारे, सदस्य, राष्ट्रीय पर्यावरण व नागरी संरक्षण