पावसाच्या दडीमुळे खरिपाची चिंता..पूर्व भागात नापिकीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:13 PM2019-07-18T22:13:26+5:302019-07-18T22:13:33+5:30
आता तर जुलै महिना संपत आला तरी खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालेली नाही. याला कारण म्हणजे उशिरा आलेला पाऊस आणि आता पावसाने मारलेली दडी.
नितीन काळेल ।
सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी उशिराने सुरू झाली असली तरी आता पावसानेच दडी मारली आहे. त्यामुळे पेरणीवर याचा परिणाम झाला आहे. जुलै संपत आला तरी आतापर्यंत बाजरीची फक्त ४६ टक्केच पेरणी झाली असून, अद्यापही जिल्ह्यातील सर्व पिकांचे मिळून ९२ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणे बाकी आहे. सध्या पश्चिमेकडील पेरणीने वेग घेतलाय.
सातारा जिल्ह्यात बहुतांशी वेळा दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यापूर्वी वळवाचा आणि मान्सून पूर्व पाऊस होतो; पण यंदा उन्हाळ्यात एकही वळवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीची मशागत करता आली नाही. तर मान्सूनचा पाऊस १५ दिवस उशिरा सुरू झाला. यामुळे शेतीची पेरणीपूर्व कामेही पूर्ण करता आली नाहीत. आता तर जुलै महिना संपत आला तरी खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालेली नाही. याला कारण म्हणजे उशिरा आलेला पाऊस आणि आता पावसाने मारलेली दडी.
पूर्व भागात सुरुवातीच्या काळात पाऊस झाला होता. काही ठिकाणी चांगला बरसला तर अनेक ठिकाणी तोंड दाखवण्याचे काम पावसाकडून झाले. त्यामुळे ओल असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली. ही पेरणी आश्वासक अशी नाही. तर पूर्वेकडे खरीप हंगामात बाजरीचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४९ हजार ५३१ हेक्टर असले तरी आतापर्यंत फक्त २२ हजार ९५८ हेक्टरवर पेरा झालाय. माणमध्ये २१ हजार ६७० पैकी ११ हजार ६४१ हेक्टरवर पेरणी झालीय. तर माण पाठोपाठ खटावमध्ये बाजरीचे क्षेत्र असते तेथेही १० हजार ६४५ पैकी ५ हजार ५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कोरेगावमध्ये सुमारे सव्वादोन हजार हेक्टरपैकी ८० हेक्टरवर पेरणी झालीय. जुलै महिना संपत आल्याने बाजरीची पेरणी होणे अवघड आहे.
पश्चिमेकडे मात्र पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामाला वेग आलाय. या भागात भात, सोयाबीन, नाचणी, तूर, उडीद, मका, भुईमूग अशी पिके घेण्यात येतात. या पिकांची पेरणी व लागण सुरू आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ७६ हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक सोयाबीनचे ५३ हजार ७५० हेक्टर असून, त्याखालोखाल भाताचे ५० हजार ८०५ तर बाजरीचे ४९ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यानंतर भुईमूग, ज्वारी पिकांचा समावेश आहे. १८ जुलैपर्यंत सोयाबीनची ४१ हजार ९७४ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ७८.०९ आहे. तर भाताची २५ हजार ४६५ हेक्टरवर पेरणी झाली असून, टक्केवारी ५० राहिलीय. सातारा, जावळी, पाटण, कºहाड, वाई तालुक्यांत भात लागण सुरू आहे. सोयाबीनची पेरणी अधिक करून सातारा, पाटण, कºहाड आणि कोरेगाव तालुक्यात झाली आहे. जिल्ह्णात भुईमुगाची पेरणी २८ हजार २३५ हेक्टरवर झाली असून, टक्केवारी ६९.८४ आहे.
आतापर्यंत भाताची लागण ५०.१२ टक्के क्षेत्रावर झाली आहे. तर ज्वारी ५९. ५६ टक्के, बाजारी ४६.३५, मका ४३.६५, नाचणी ६५.८२, तूर ५६.३६, उडीद ५४.६५, मूग ८०.३१, भुईमूग ६९.८४, तीळ ५१.६१, सूर्यफूल १६.८७, कारळा ४२.३९ टक्के अशी पेरणी झाली आहे.
पूर्वेकडील हंगाम वाया जाणार...
पूर्व भागातील शेतकºयांनी सुरुवातीच्या पावसावर बाजरीची पेरणी केली. आता पीक उगवून आलं असलंतरी पावसाने दडी मारलीय. त्यामुळे पीक वाळून जाऊ लागलं आहे. तर पाऊस होईल, या आशेवर काही शेतकरी पेरणी करण्यास थांबले होते. आता तर पाऊसच नसल्याने व जुलै महिना संपत आला असताना येथे पेरणी होणे शक्य नाही, त्यामुळे शेतकºयांना इतर पिकांकडे वळावे लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंतची तालुकानिहाय झालेली पेरणी टक्केवारी