येथील पालिकेने यावर्षी चतुर्थ वार्षिक कर आकारणी लागू केल्यामुळे मागील करापेक्षा १९ टक्के जादा करवाढ झाली आहे. सुमारे साडेतीन कोटी वसुलीचे उद्दिष्ट आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत २ कोटी २५ लाख वसुली झाली आहे. उर्वरित सुमारे सव्वा कोटीच्या वसुलीसाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील, त्या करून पालिकेने यावर्षी शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पालिकेच्या हद्दीत सुमारे १८ हजार मिळकतदार आहेत. त्यापैकी १४३ मिळकतदार पन्नास हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणारे आहेत. त्यानुसार थकीत कराच्या वसुलीसाठी पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
थकबाकीदारांना नोटिसा दिल्या आहेत. प्रथम नोटीस मिळाल्यापासून कर भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. या नोटिसीद्वारे पालिका नियमानुसार मिळकतींची सार्वजनिक प्रसिद्धी देणे, जप्ती वॉरंट काढणे, ध्वनिक्षेपकावरून नाव पुकारून सावधान करणे, नळ कनेक्शन बंद करणे, मिळकतींवरील भार दाखवणे, खरेदी-विक्रीपासून मज्जाव करणे, डिफॉल्टर घोषित करणे असे कठोर निर्णय घेतले जाणार, असे सूचित केले आहे. दोन वर्षे व त्यापेक्षा जुन्या थकीत कराची वसुली व्हावी म्हणून कर विभाग विशेष प्रयत्नशील आहे. या पर्यायानंतरही थकीत कर न वसूल झाल्यास संबंधिताला जप्तीपूर्व नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतरही कर वसूल न होणाऱ्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव काढण्यासाठी किंवा त्या मालमत्ता पालिकेच्या नावावर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.
- चौकट
१ मार्चपासून कठोर पावले
वसुलीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम ठेवणे हे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यात मोबाईल टॉवर, काही संस्था, शाळा व वैयक्तिक स्वरूपात कर थकीत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत थकीत कराची वसुली न झाल्यास १ मार्चपासून कुलूप लावणे, मालमत्ता सील करणे अशी मोहीम हाती घेतली जाणार आहे. वेळप्रसंगी प्रत्यक्ष जप्तीची कठोर पावले उचलून थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याची तयारीही वसुली विभागाने ठेवली आहे.
- कोट
अनेकवेळा नोटीस देऊनही थकबाकी ठेवणाऱ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलक लावणे, यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर बॅन्ड लावून कर वसूल करणे, पालिकेचा बोजा थकबाकीदाराच्या मालमत्तेवर नोंद करणे अशा व यापेक्षाही कठोर कारवाया करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
- राजेश काळे, कर विभाग प्रमुख