तालुक्याच्या मुख्यालयातच संभ्रमावस्था..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:01+5:302021-04-07T04:40:01+5:30
वडूज : राज्यातील वाढत्या कोरोना महामारी संसर्गाला थोपविण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी जारी केला होता. मात्र, ...
वडूज : राज्यातील वाढत्या कोरोना महामारी संसर्गाला थोपविण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी जारी केला होता. मात्र, याबाबत खटाव तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडूज शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिक व संबंधित प्रशासन यांच्यात प्रसंगी शाब्दिक चकमकी उडत आहेत.
कोरोना महामारीची दुसरी लाट तीव्र झाल्याने राज्य शासनाने ठोस पावले उचलत ही साखळी तोडण्यासाठी मिनी लॉकडाऊनसहीत काही बाबतीत कडक निर्बंध लागू केलेले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला. राज्य शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अध्यादेश सोशल मीडियावर फिरत असल्याने गत दोन दिवसांपूर्वीपासून नागरिक व व्यापाऱ्याच्यांत द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढविणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अध्यादेश जारी केले. यामध्ये वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. रुग्णालये, मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने यांना यामध्ये सूट दिली आहे. तसेच कोविडच्या नियमांचे योग्य व काटेकोरपणे पालन याचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. कोविड-१९ विषाणूचा प्रसार होत असल्याचा संभव असेल तर अशी ठिकाणे तत्काळ बंद करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक दुकानांचे मालक आणि दुकानांवर काम करणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. तसेच या काळात सोमवार ते शुक्रवार हॉटेल पार्सल व्यवस्था सकाळी सात ते आठ या वेळेत सुरू राहतील.
(चौकट)
सूचनांचे तंतोतंत पालन करा
या सर्व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन झाल्यास कोरोना महामारीची साखळी तुटण्यास मदतच होणार आहे. परंतु वडूजमध्ये या अध्यादेशाबाबत उलट-सुलट चर्चांमुळे आणि संबंधित स्थानिक प्रशासनाकडून ठोस भूमिका नसल्या कारणांने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. परंतु काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क राहिल्यामुळे ही कोरोना महामारीची साखळी तोडण्यास मदतच होणार आहे.
०६वडूज
फोटो .. वडूज शहरात मार्गदर्शक सूचनांचे नगरपंचायतीचे कर्मचारी प्रबोधन करीत आहेत. (शेखर जाधव)